Tarun Bharat

नाझर कॅम्प तलावात यंदाही विसर्जनास बंदी?

कोसळलेल्या विहिरीकडे महापालिकेचे दुर्लक्ष : दुरुस्ती करण्याकडे कानाडोळा

प्रतिनिधी /बेळगाव

वडगाव परिसरातील गणेशभक्तांच्या सुविधेसाठी नाझर कॅम्प, वडगाव परिसरात विसर्जन तलाव निर्माण करण्यात आला. काही वर्षे यामध्ये मूर्ती विसर्जन करण्यात आले. पण शेजारी असलेली विहीर कोसळल्याने या विसर्जन तलावात गणेशमूर्ती विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यात आले नाही. तसेच दुरुस्तीकडे कानाडोळा करण्यात आल्याने यंदाही विसर्जनास बंदी राहणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.

वडगाव परिसरातील गणेशमूर्तींचे विसर्जन जेल शाळेच्या विहिरीमध्ये करण्यात येत होते. पण शहरातील विहिरींचे पुनरुज्जीवन करून या ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्र बसवून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे जेल शाळेच्या विहिरीमध्ये गणेशमूर्ती विसर्जनास बंदी घातली आहे. गणेशमूर्ती बनविण्यासाठी पीओपीचा वापर होत असल्याने पाणी दूषित होत आहे. त्यामुळे कोणत्याही विहिरीत अथवा तलाव, नदीमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्यास बंदी आहे. परिणामी वडगाव परिसरातील भाविकांची गैरसोय झाली. वडगाव परिसरातील भाविकांना कपिलेश्वर तलाव, रामेश्वर तीर्थ व जुने बेळगावला विसर्जनासाठी जावे लागले. याची दखल घेऊन नाझर कॅम्प, वडगाव परिसरात महापालिकेच्या जागेत नवीन विसर्जन तलाव निर्माण करण्यात आला. पण काही वर्षांनंतर या तलावात विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे. शेजारी असलेली विहीर कोसळल्याने हा तलाव धोकादायक बनला आहे. बालोद्यानात असलेल्या विहिरीवर जलशुद्धीकरण यंत्र बसवून वडगाव परिसरात पाणीपुरवठा करण्यात येत होता. पण पावसामुळे तसेच विहिरीच्या भिंती जीर्ण झाल्याने ही विहीर कोसळली. त्यानंतर विहिरीच्या बाजूने असलेली मातीदेखील ढासळल्याने विसर्जन तलावाच्या एका बाजूची माती विहिरीत कोसळली. परिणामी तलावाची एका बाजूची भिंत उघडय़ावर आहे. तलावात विसर्जन केल्यास तलावदेखील विहिरीमध्ये ढासळण्याचा धोका आहे. त्यामुळे तलावात गणेशमूर्ती विसर्जनास तीन वर्षांपासून बंदी घालण्यात आली आहे.

वास्तविक, सदर विहीर ब्रिटिशकालीन असून पाणीसाठा मोठय़ा प्रमाणात होतो. विहिरीचे पुनरुज्जीवन करून परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्त आहे. पण पाणीपुरवठा मंडळ आणि महापालिकेने विहिरीच्या पुनरुज्जीवनाकडे दुर्लक्ष केले आहे. सदर विहीर बुजविण्याकडेही कानाडोळा केला आहे. सध्या हा परिसर धोकादायक बनला असून आजूबाजूच्या इमारतींनादेखील धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने गणेशोत्सवापूर्वी सदर विहीर पूर्णपणे बुजवावी किंवा विहिरीचे पुनरुज्जीवन करावे आणि हा तलाव गणेशमूर्ती विसर्जनासाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.

Related Stories

आरटीओ कार्यालयात ऑनलाईन प्रशिक्षण

Amit Kulkarni

कपिलेश्वर मंदिरात नवचंडी होम

Patil_p

मंगळवारी जिह्यात 18 जण पॉझिटिव्ह

Patil_p

ज्ञान मंदिर शाळेत हिंदी विषय शिक्षकांची कार्यशाळा

Amit Kulkarni

बेळगाव जिह्यातील 23 जणांना कोरोनाची लागण

Patil_p

बसस्थानक तळमजल्याच्या कामाला गती

Amit Kulkarni