प्रतिनिधी/ सातारा
गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर अशा घोषणा देत गेल्या पाच दिवसांपासून आनंददायी, उत्साही वातावरणात आलेल्या बाप्पांना सोमवारी सातारा शहरासह जिह्यात भक्तीमय वातावरणात निरोप दिला. घरगुती गणपती बाप्पांसोबतच गौराईंचेही विसर्जन करण्यात आले. शहरात गोडोली तळे, फुटका तलाव, संगममाहुली आदी ठिकाणी विसर्जनाकरीता भाविकांची गर्दी झाली होती. विसर्जनादरम्यान काही काळ पाऊस झाल्यामुळे थोडासा व्यत्यय आला होता. परंतु गणेशभक्तांनी घरगुती गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
परंपरेप्रमाणे बाप्पांची विधिवत पुजन करून, मोदकांचा नैवेद्य दाखवुन श्री मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अनेकांनी पालिकेच्या माध्यमातुन उभारण्यात आलेल्या कृत्रिम तळय़ात श्री मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अनेक भाविकांनी विसर्जन हे सायंकाळच्या सुमारास करण्यात आले. घरगुती बाप्पांचे विसर्जन असल्याने अनेक व्यापाऱयांनी आपली दुकाने सायंकाळच्या सुमारास बंद ठेवली होती. त्यामुळे बाजारपेठेतही ग्राहकांची गर्दी तुरळक प्रमाणात दिसत होती.
मागील दोन वर्ष कोराना आणि लॉकडाऊनमुळे हा उत्सव साजरा करण्यावर बंधने घालण्यात आली होती. पण यंदा मात्र मोठय़ा उत्साही वातावरणामध्ये हा सण साजरा करता येत असल्याने असेच वातावरण प्रतिवर्षी असुदे अशी प्रार्थना ही करण्यात आली. यंदा पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून अनेकांनी पर्यावरणपूरक श्री मूर्तींची स्थापना केली होती. त्यामुळे काही भाविकांनी आपल्या घरातील मोठय़ा ड्रमामध्ये विधिवत विसर्जन केले.
सातारा शहरानजीकच्या परळी भागातील उरमोडी नदीवर सोनगाव येथे तसेच शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णा वेण्णा संगम असलेल्या संगम माहुली येथेही नदीवर गणेश विसर्जन मिरवणुकीने करण्यात आले. संगम माऊली येथे यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीला गणेश भक्तांना सामोरे जावे लागले. घरगुती गणेश विसर्जन झाल्यानंतर आता शहरातील अनेक सार्वजनिक मंडळांचे देखावे आणि विशेष सजावट सुरू करण्यात आली आहे.


घरगुती गणेशाच्या विसर्जनावेळी पाऊस
मागील काही दिवस कडाक्याचे उन्ह होते, मात्र सोमवारी सायंकाळच्या सुमारास शहर परिसरासह सर्वत्र पावसाचे जोरदार आगमन झाले. यामुळे विसर्जनाकरीता गेलेल्या भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. अनेकांकडुन पाऊस गेल्यानंतर बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. गणेश आगमना दिवशीही सायंकाळी जोरदार पाऊस पडल्यामुळे गणेशभक्तांची तारांबळ झाली होती. त्याचप्रमाणे घरगुती गणेशाला विसर्जन देताना पाऊस आला होता. त्यामुळे काही काळ गणेशभक्तांची तारांबळ झाली होती.
कृत्रिम तळी आणि पाण्याचे कुंड
शहरात विसर्जनानिमित्त पाच ठिकाणी कृत्रिम तळी उभारण्यात आली होती. यामध्ये जलतरण तलावासह, हुतात्मा स्मारक, कल्याणी शाळा, दगडी शाळा येथे कृत्रिम तळी उभारण्यात आली होती. तसेच माचन व परिसरात 30 ठिकाणी पाण्याचे कुंड व निर्माल्य कलश ही ठेवण्यात आले होती. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक तळय़ावर चार ते पाच सुरक्षारक्षकांसह पालिकेचे कर्मचारी ही होते.