आपल्या शरीरात विशिष्ट प्रकारच्या पेशींकडे शरीरात शिरलेले रोगजंतू ओळखून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना संपविण्याचे कौशल्य असते. अशा पेशींची संख्या शरीरात अन्य पेशींच्या मानाने कमी असते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर रोगजंतू शरीरात शिरल्यास या पेशींची क्षमता अपुरी पडू लागते आणि शरीर त्या रोगजंतूंपासून होणाऱया विकाराची शिकार होते. तथापि, आता रोगप्रतिकारक पेशींची संख्या शरीरात आवश्यकतेनुसार अल्पावधीत वाढवण्यास अनुकूल ठरेल, असे तंत्रज्ञान निर्माण करण्यात संशोधकांना यश आले आहे.
सॅपफान ईएम-एच इन्स्टिटय़ूटचे संशोधक पॉली फोर्डायस यांच्या नेतृत्वात स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या काही वैज्ञानिकांनी हे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. शरीरातील पेशींपैकी कोणत्या पेशी रोगप्रतिकार करण्यास सक्षम आहेत, हे या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्वरित ओळखता येते आणि तशाप्रकारच्या पेशींची संख्या शरीरात आवश्यकतेनुसार वाढेल, अशी व्यवस्था करता येते. रोगप्रतिकारवर्धक पेशींपैकी ‘टी’ पेशी या शरीरात गस्त घालण्याचे काम करतात. मात्र, त्यांचा वेग अत्यंत कमी असतो. त्यांच्या आवरणावर एका विशिष्ट प्रोटिनचे कण असतात, जे रोगजंतूंना ओळखण्यात सक्षम असतात. हे प्रोटिन एकमेकांशी जोडले जाऊन हिस्टोकॅम्पॅटिबिलिटी कॉम्प्लेक्स (पीएमएचसी) तयार करतात. हा रोगजंतूंशी लढण्याचा पेशींनी निर्माण केलेला एक प्रकल्पच असतो. ज्यावेळी ‘टी’ पेशी रोगनिर्माण करणाऱया पेप्टाईडला ओळखतात तेव्हा पीएमएचसी सक्रिय होत असतो. त्यानंतर शरीरात शिरलेल्या जंतूंना मारण्याची प्रक्रिया सुरू होते.
ही जटील प्रक्रिया आहे. यासाठी शरीराला बरीच ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळेच आजारीपणामध्ये माणूस पुष्कळ अशक्त होतो. ‘टी’ पेशींचा वेग वाढविल्यास कमी उर्जेत अधिक जंतूंना मारण्याची क्षमता त्या पीएमएचसीमध्ये निर्माण करू शकतात. नेमके हेच उद्दिष्ट या नव्या तंत्रज्ञानाने साध्य होते. त्यामुळे रोगनिवारण लवकर होऊन अशक्तपणाही कमी येतो. हे तंत्रज्ञान अद्याप बाल्यावस्थेत आहे. मात्र, लवकरच ते व्यापारी तत्वावर उपलब्ध होणार आहे.