करवीर तहसिलदार कार्यालयासमोर निदर्शने : ‘एनपीएस’ हटाव सप्ताहाला सुरुवात
प्रतिनिधी/कोल्हापूर
‘एनपीएस’ हटवून सरकारी कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे सोमवारी करवीर तहसिलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणूण सोडला.
राज्य मध्यवर्ती संघटनेच्या आदेशाप्रमाणे कोल्हापूरात जिल्हा शाखेच्या नेतृत्वाखाली सोमवारी ‘एनपीएस’हटाव सप्ताहास सुरवात झाली. याचाच एक भाग म्हणून संघटनेचे राज्य सरचिटणीस अनिल लवेकर व करवीर पुरवठा अधिकारी दत्तात्रय पाडळकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. ‘एनपीएस’ हटाव, जुनी पेन्शन योजना लागू करा, अशा जोरदार घोषणा आंदोलकांनी दिल्या.
‘एनपीएस’ हटाव सप्ताह दिनांक 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत चालणार आहेत.या सप्ताहात विविध कार्यालयासमोर सोईच्या वेळेत निदर्शने करणेत येणार आहेत. यासंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदाराना निवेदन देणेत येणार आहे. या पार्श्वभूमीवर राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबीटकर यांना महसूल कर्मचारी अकिल शेख, अंकुश रानमाळे, नंदकुमार इंगवले निवेदन सादर केले.
आंदोलनात संजय क्षिरसागर, विठ्ठल वेलणकर, विद्या शिंदे, राजू आंबेकर,प्रशांत मिसाळ, सचिन सावळेकरी, सुरेश पानारी, प्रवीण भोसले, विश्वास डोंगरे, मनिषा पाटील, सुरेश गुरव, विनायक हुपरे आदी सहभागी झाले होते.