पुणे / प्रतिनिधी :
सर्व सार्वजनिक विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये, सर्व अभिमत महाविद्यालये यांच्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून (2023-24) पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या राज्य सुकाणू समितीचे अध्यक्ष व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी येथे दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या धोरणाच्या अनुषंगाने शिक्षणात होणाऱ्या बदलांची माहिती देण्यासाठी जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. करमळकर बोलत होते. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सुकाणू समिती सदस्य व तज्ञ मार्गदर्शक प्राचार्य अनिल राव, समिती सदस्य व मुंबई विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. आर. डी. कुलकर्णी, व्यवस्थापन परिषद सदस्य व कार्यक्रमाचे संयोजक डॉ. रवींद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ. संजय ढोले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. करमळकर म्हणाले, विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर अभ्यासक्रम पूर्ण करत बाहेर पडण्याची संधी आहे. पालकांनी, विद्यार्थ्यांनी धोरणानुसार होणाऱ्या बदलांनी गोंधळून, घाबरून न जाता याकडे संधी म्हणून पाहावे.
अधिक वाचा : राज्यात पुन्हा अवकाळीचे ढग