वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सहमतीने गर्भधारणा झाल्यास 20 आठवडय़ानंतर गर्भपात करण्यासाठी अनुमती दिली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. एका पंचवीस वर्षाच्या महिलेने 20 आठवडय़ांचा गर्भ नाहिसा करण्याची अनुमती उच्च न्यायालयाकडे मागितली होती. तथापि अशा प्रकारचा गर्भपात करणे बेकायदेशीर आहे, असे स्पष्ट करत अनुमती नाकारण्यात आली आहे.
याचिकाकर्त्या महिलेला सुसज्ज रुग्णालयात प्रवेश द्यावा आणि तिची प्रसुती योग्य प्रकारे केली जाईल याची दक्षता बाळगावी, असाही आदेश न्यायालयाने दिला. ही महिला एका पुरुषाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होती. या कालावधीत शरीरसंबंध आल्याने महिलेला गर्भधारणा झाली. तिच्या सहकार्याने तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला. त्यामुळे महिलेने गर्भपात करण्यासाठी अनुमती मागितली होती. ती अनुमती नाकारण्यात आली आहे.