2022 ते 23 मधील आयाती संदर्भातील जीटीआरआयचे संकेत
नवी दिल्ली :
चालू आर्थिक वर्षात भारताची व्यापार आयात जवळपास 16 टक्क्यांनी वाढून 710 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. इकॉनॉमिक थिंक टँक ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (जीटीआरआय) ने बुधवारी एका अहवालात म्हटले आहे की कच्चे तेल, कोळसा, हिरे, रसायने आणि इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या वस्तुंच्या आयातीत वाढ होणार असल्याने यामुळे वरील उद्दिष्ट गाठले जाण्याची शक्यता आहे.
जीटीआरआयने म्हटले आहे की कमकुवत जागतिक मागणी आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मंदीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर किरकोळ परिणाम होऊ शकतो.
पेट्रोलियम, कच्चे तेल, कोळसा, कोक, हिरे, मौल्यवान धातू, रसायने, रबर, प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक्स आणि यंत्रसामग्री या भारताच्या एकूण व्यापारी मालाच्या आयातीपैकी 82 टक्के आयात सहा उत्पादन श्रेणींची आहे.
पेट्रोलियम आयातचे मूल्य : अजय श्रीवास्तव, जीटीआरआय
जीटीआरआयचे सह-संस्थापक अजय श्रीवास्तव म्हणाले, भारताची व्यापार आयात मार्च 2023 मध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षात 710 अब्ज डॉलर्सवर पोहोचू शकते. 2021-22 मधील 613 अब्ज डॉलरच्या तुलनेत हे 15.8 टक्क्यांनी जास्त असणार आहे. पेट्रोलियम आयातीचे मूल्य 210 अब्ज डॉलर असेल आणि त्यात कच्चे तेल आणि एलपीजीचा समावेश होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत कच्च्या मालाच्या आयातीत 53 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात रशियामधून आयात 850 टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी, कोक आणि कोळशाची आयात 2022-23 मध्ये 51 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.