Tarun Bharat

आणीबाणी लादून लोकांच्या हक्कांवर गदा!

Advertisements

हुकूमशाहीचे असे उदाहरण जगात सापडणे कठीण

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, 26 जून रोजी मन की बात कार्यक्रमातून देशाला संबोधित केले. 90 व्या भागामध्ये पंतप्रधानांनी आणीबाणीचा संदर्भ देत त्या काळात देशातील नागरिकांकडून जगण्याच्या अधिकारासह सर्व हक्क हिरावून घेतल्याचे सांगितले. जगात आणीबाणीच्या काळात हुकूमशाहीचे दुसरे उदाहरण मिळणे अवघड असल्याचे ते म्हणाले.

मला आज तुमच्याशी जनआंदोलनांविषयी चर्चा करायची आहे, असे सांगत पंतप्रधानांनी विविध आंदोलनांचा संदर्भ आपल्या भाषणात दिला. विशेषतः तरुण पिढीला उद्देशून तुम्हाला माहीत आहे का, की तुमचे आई-वडील तुमच्या वयाचे असताना एकदा त्यांचा जगण्याचा अधिकारही त्यांच्याकडून काढून घेण्यात आला होता! तुम्ही विचार करत असाल की हे कसे होऊ शकते? हे अशक्मय आहे. पण माझ्या तरुण मित्रांनो, हे एकदा आपल्या देशात घडले होते. 1975 मध्ये आणीबाणी लागू करून त्या काळात देशातील नागरिकांकडून सर्व अधिकार काढून घेण्यात आले होते, असे पंतप्रधान म्हणाले. त्यावेळी भारताच्या लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. देशाची न्यायालये, प्रत्येक घटनात्मक संस्था, प्रसारमाध्यमे या सर्वांवर नियंत्रण होते, असेही त्यांनी सांगितले. या दाखल्यांच्या माध्यमातून तरुण पिढीला सतर्क करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

अनेक बंधने झेलल्यानंतरही भारतातील लोकांचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत झालेला नाही. भारतातील लोकांसाठी, शतकानुशतके चालत आलेली लोकशाहीची मूल्ये, जी लोकशाही भावना आपल्या शिरपेचात आहे, त्याचा अखेर विजय झाला आहे. भारतातील जनतेने लोकशाही मार्गाने आणीबाणी हटवून लोकशाहीची पुनर्स्थापना केली. आणीबाणीचा तो भीषण काळ आपण कधीही विसरू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

अवकाश क्षेत्रात विविध संधी उपलब्ध

देशात अवकाश क्षेत्राशी संबंधित अनेक मोठी कामे झाली आहेत. देशाच्या या यशांपैकी एक म्हणजे इन-स्पेस नावाची एजन्सी तयार करणे. ही एजन्सी अंतराळ क्षेत्रात भारताच्या खासगी क्षेत्रासाठी नवीन संधींना प्रोत्साहन देत आहे. याचा लाभ तरुण पिढीने घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. इन-स्पेसच्या कार्यक्रमात मी मेहसाणातील एक शाळकरी मुलगी तन्वी पटेल हिला भेटलो होतो. ती एका लघु उपग्रहावर काम करत असून तो येत्या काही महिन्यांत अवकाशात सोडला जाणार आहे. तन्वीप्रमाणेच देशातील सुमारे साडेसातशे शालेय विद्यार्थी 75 उपग्रहांवर काम करत आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी हे देशातील छोटय़ा शहरांतील असल्याचे त्यांनी सांगितले.

बुस्टर डोस वेळेवर घेण्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह, विशेषतः वृद्धांसह कोविड-19 लसीचे बुस्टर डोस वेळेवर घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच हात स्वच्छ ठेवावेत आणि मास्क वापरावेत. कोरोनापासून बचावासाठी आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आज देशाला लसीचे व्यापक संरक्षण उपलब्ध आहे ही समाधानाची बाब आहे. आम्ही 200 कोटी लसींच्या डोसच्या जवळ आलो आहोत. देशात जलद बुस्टर डोसही लागू केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

राजस्थानमध्ये 2,132 नवे कोरोना रुग्ण; 15 जणांचा मृत्यू

Rohan_P

2 मतदारसंघांमध्ये लढविता येणार नाही निवडणूक?

Patil_p

कोरोनाचा कहर : पंजाबमध्ये उच्चांकी रुग्ण संख्या

Rohan_P

विधानपरिषद निवडणुकीचे वाजले बिगुल

Patil_p

जम्मूच्या शेतकऱयांसाठी बीएसएफचा पुढाकार

Patil_p

सीपीईसीत तिसऱया देशाची भागीदारी अस्वीकारार्ह

Patil_p
error: Content is protected !!