शाहबाज शरीफ घेऊ शकतात निवडणुकीचा निर्णय
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानात राजकीय उलथापालथ सुरूच आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेवरून हटविण्यात आल्यावर शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली कमीत कमी 9 राजकीय पक्षांचे आघाडी सरकार स्थापन झाले होते. परंतु हे सरकार आता अस्थिर होत असल्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत इम्रान खान यांनी स्वतःच्या समर्थकांना इस्लामाबादच्या दिशेने कूच करण्याचे आवाहन करत शक्तिप्रदर्शनाची तयारी चालविली आहे.
पीएमएल-एन या शाहबाज यांच्या पक्षातूनच लवकर निवडणूक घेण्याची मागणी केली जात आहे. देशाची बिघडती आर्थिक स्थिती पाहता हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. शाहबाज यांचे ज्येष्ठ बंधू आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांना लवकर निवडणूक करविण्याची सूचना केली असल्याचे समजते.
नवाज सध्या लंडनमध्ये असून शाहबाज शरीफ सरकारला स्वतःचा कार्यकाळ पूर्ण करणे अवघड असल्याचे पाहून त्यांनी ही सूचना केली आहे. नवाज यांच्या कन्या आणि पीएमएल-एनच्या अध्यक्ष मरियम यांच्या माध्यमातून यासंबंधीचा संदेश समर्थकांमध्ये प्रसारित केला जात आहे.
दुसरीकडे पाकिस्तान पीपल्स पार्टीसह अन्य घटक पक्षांनी शाहबाज यांना लवकर निवडणूक न घेण्याचा आणि देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कठोर तसेच साहसी आर्थिक निर्णय घेण्याची सूचना केली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटींचे पालन करणे पाक सरकारला अवघड ठरत चालले आहे.
30 लाख निदर्शक एकवटणार
सरकार अनिश्चित स्थितीत असताना माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लाँच मार्चचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. बुध्घ्वारी इस्लामाबादमध्ये कमीत कमी 30 लाख निदर्शक एकजूट होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मुदतपूर्व निवडणुकीची घोषणा होत नाही तोवर राजधानीतून बाहेर पडणार नसल्याचे इम्रान यांनी म्हटले आहे.