ऑनलाईन टीम/तरुण भारत
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (imran khan) यांनी लाखो कार्यकर्त्यांसमोर मोठी घोषणा केली आहे. रावळपिंडीत (rawalpindi) रॅलीला संबोधित करण्यासाठी आलेल्या खान यांच्यासोबत डॉक्टरांची एक टीमदेखील होती. यावेळी त्यांनी देशातील सर्व विधानसभांमधील पीटीआयचे आमदार राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. याबाबतचे वृत्त पाकिस्तानच्या ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने दिले आहे.
यावेळी इम्रान खान यांनी रावळपिंडीत झालेल्या जाहीर सभेत पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी सभेत सर्व जागांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. ७० वर्षी इम्रान खान यांनी या जागा सोडण्याबाबत राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. “आपल्या देशाचे नुकसान करण्याऐवजी ही भ्रष्ट व्यवस्था सोडून जाणेच योग्य आहे”, असे खान यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाची शनिवारी रावळपिंडीत रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला संबोधित करताना इम्रान खान यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख केला. यावेळी इम्रान खान यांनी म्हटलं की, माझा मृत्यूशी जवळून सामना झाला होता आणि माझ्यावर हल्ला झाला तेव्हा माझ्या डोक्यावरून नजरेसमोर गोळ्या चालवल्या जात होत्या.’ हल्ल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या पहिल्या भाषणात खान यांनी आरोप केला की, तीन गुन्हेगार माझ्यावर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत.