पंजाब प्रांतात मोठा विजय ः 20 पैकी 16 जागांवर पीटीआय विजयी
वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)ने पंजाब प्रांतातील पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. पीटीआयने मुल्तान, डेरा गाजी खान, साहिवाल आणि खुशाबमध्ये विजय मिळविला आहे. तर एकूण 12 जागांवर पीटीआयने यश मिळविले आहे. पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाजने पराभव मान्य करत पीटीआयचे अभिनंदन केले आहे. पोटनिवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करणाऱया पीएमएल-एन उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी निकाल मान्य असल्याचे म्हटले आहे.
मरियम यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आत्मावलोकन करत त्रुटी ओळखून त्या दूर करण्याचे आवाहन केले. लोकांच्या निर्णयाचा आदर करण्यात यावा. राजकारणात विजय किंवा पराभव होतच असतो. मोठय़ा मनाने निकाल स्वीकारून स्वतःमधील त्रुटी ओळखून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जावा असे मरियम यांनी म्हटले आहे.
पंजाब प्रांतात एप्रिलपर्यंत पीटीआयचेच सरकार होते. एप्रिल महिन्यात इम्रान खान यांनी पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांना हटवून परवेज इलाही यांना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला होता. इलाही गटाकडे 8 खासदार होते. इम्रान यांनी स्वतःचे पंतप्रधानपद वाचविण्यासाठी बुजदार यांच्याकडी पद काढून घेतले होते. अशा स्थितीत पीटीआयच्या एका गटाने इम्रान यांचा आदेश मानण्यास नकार देत पंजाब विधानसभेत पीएमएल-एनच्या बाजूने मतदान केले होते. इम्रान यांच्या पक्षाने या आमदारांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यामुळे प्रांतातील 20 मतदारसंघ रिक्त झाले होते.
पंतप्रधानांना झटका
पंजाब प्रांत हा शरीफ कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. पंतप्रधान शाहबाज शरीफ हे स्वतः तीनवेळा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री राहिले आहेत. यावेळच्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या प्रचाराची धुरा नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम यांच्या हातात होती. अशा स्थितीत इम्रान खान यांच्या विजयाने प्रांतासह देशात मोठय़ा बदलाचे संकेत मिळाले आहेत. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा यावेळी इम्रान यांच्या पक्षाला मिळाल्या आहेत. निवडणुकीचा हा निकाल सैन्य आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासाठी मोठा झटका आहे.