Tarun Bharat

चीनमध्ये अध्यक्ष, पंतप्रधान आमने-सामने

क्षी जिनपिंग ‘फेल’ ः नेतृत्त्वाला विरोध करण्याच्या तयारीत ली केकियांग

वृत्तसंस्था / बीजिंग

चीनची जनता सध्या दुहेरी मार सहन करत आहे. एकीकडे कोरोना महामारीने तीव्र रुप धारण केले आहे. तर दुसरीकडे शासनाच्या झिरो कोविड पॉलिसीमुळे संक्रमण कमी होण्याऐवजी लोकांच्या अडचणी वाढत आहेत. शासनाची झिरो कोविड पॉलिसी अपयशी ठरत असल्याचे दिसून येत असून जनतेतील नाराजी वाढत आहे. मागील आठवडय़ात पंतप्रधान ली केकियांग यांनी 1 लाख शासकीय अधिकाऱयांना स्थिती सुधारण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची सूचना केली होती. केकियांग यांनी याद्वारे एकप्रकारे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या नेतृत्त्वाला आव्हान दिल्याचे मानले जात आहे.

चीनची अर्थव्यवस्था आता मोठय़ा संकटाला तोंड देत आहे. चीनच्या पंतप्रधानांचे अशास्थितीतील हे आवाहन असाधारण मानले जात आहे. केकियांग यांना त्यांच्या दोन कार्यकाळातील बहुतांशवेळा दुर्लक्षित रहावे लागले आहे. चीनमध्ये दुसऱया क्रमांकाच्या पदावर असूनही केकियांग यांना फारसे महत्त्व मिळत नाही.

चीनचे राजकीय भविष्य संकटात?

स्टेट कौन्सिल एक्झिक्युटिव्ह मीटिंगमध्ये ली यांनी केलेले आवाहन हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षात देशाच्या आर्थिक भवितव्याबद्दल चिंता दर्शविणारे तसेच चीनच्या राजकीय भविष्याच्या संकटाचे संकेत देणारेदेखील आहे. चीनचे माजी अध्यक्ष हू जिंताओ यांच्या गटातून संभाव्य अध्यक्ष म्हणून पाहिले गेलेल्या ली केकियांग यांना सुमारे एक दशकापूर्वी पंतप्रधान झाल्यापासून बाजूला सारण्यात येत आहे.

स्वतःच्या धोरणामुळे जिनपिंग अडचणीत

ली केकियांग यांच्याकडे अलीकडेच चीनमधील महामारी हाताळण्याशी संबंधित व्यवस्थेच्या देखरेखीची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु चीनच्या ‘झिरो कोविड पॉलिसी’साठी अध्यक्ष क्षी जिनपिंग जबाबदार आहेत. चीनच्या झिरो कोविड पॉलिसीने जिनपिंग यांना चांगलेच अडचणीत आणले आहे. या धोरणाच्या अंतर्गत वर्षाच्या प्रारंभापासूनच कोटय़वधी लोक कठोर लॉकडाऊनमध्ये कैद असून चीनचे प्रमुख उद्योग यामुळे प्रभावित झाले आहेत.

ली यांची भूमिका वाढणार

ली केकियांग पुन्हा चर्चेत आल्याने चिनी नेतृत्त्वाचे काही गट जिनपिंग यांचा तिसरा कार्यकाळ आणि त्यांच्या झिरो कोविड धोरणाच्या प्रभावावरून चिंतेत असल्याचे निदर्शनास येते. जिनपिंग यांच्यावरील वाढती टीका आणि अर्थव्यवस्था सावरण्यास अपयश येत असल्याने केकियांग यांची भूमिका मजबूत होणार असल्याचे जाणकारांचे मानने आहे.

Related Stories

चीनच्या हट्टाग्रहामुळे लडाख वाद

Patil_p

अफगाणिस्तानात सत्ता काबीज करणारा मुल्ला अब्दुल गनी बरदार काबूलला परतला

Archana Banage

रशियात ‘कोरोनावीर’ औषधाला मंजुरी

datta jadhav

पाकिस्तानला नोव्हेंबरमध्ये मिळणार नवा सैन्यप्रमुख

Patil_p

ब्रिटनच्या महाराणींवर आज अंत्यसंस्कार

Patil_p

तुर्कस्तानमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का, भारत सरकार करणार मदत

Archana Banage
error: Content is protected !!