दापोली/प्रतिनिधी
माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा पुतळा जाळण्यावरून दापोलीत आज मंगळवारी ठाकरे व शिंदे गट यांच्यात जोरदार राडा झाला. यावेळी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
ठाकरे गटाकडून रामदास कदम यांचा यांच्या विरोधात शिवसेना शाखेसमोर जोरदार घोषणाबाजी करून पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र याला शिंदे गटाकडून घोषणाबाजी करून जोरदार आक्षेप घेण्यात आला. अखेर पोलिसांनी पुतळा ताब्यात घेऊन तो पोलीस स्थानकात आणून ठेवला.
यानंतर शिंदे गटाकडून शिवसेना शाखेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी शिंदे गट व ठाकरे गट यांच्या जोरदार झटापट पाहायला मिळाली. पोलिसांनी बळाचा वापर करून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवसेना शाखेतून बाहेर काढले. यावेळी दोन्ही गटाकडून शिवसेना शाखेच्या मालकीवरून ताठर भूमिका घेण्यात आली व शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून शिवसेना शाखेसमोर जमलेल्या जमावाला पांगवले.
रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूच्या तक्रारी घेण्याचे काम दापोली पोलीस ठाण्यात सुरू होते. यामुळे दापोलीत प्रचंड तणावाचे वातावरण असून पोलिसांनी पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे.