वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातमध्ये चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करणाऱया काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. दाहोद, नर्मदा, छोटा उदयपूर आणि वडोदरा येथील आदिवासी भागातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि भारतीय आदिवासी पक्षाचे 600 हून अधिक नेते आणि कार्यकर्ते गुजरात भाजपचे अध्यक्ष सी.आर. पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये सामील झाले आहेत.
दाहोदमध्ये काँग्रेसचे 400 हून अधिक कार्यकर्ते तसेच आप आणि बीटीपीचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. झालोद नगरपालिकेचे 8 नगरसेवक देखील यात सामील आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोनल डिंडोर, छोटा उदयपूरचे काँग्रेस प्रमुख उमेश शाह, माजी जिल्हाध्यक्ष यशपाल सिंह ठाकोर, नयना शाह न्य नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत.
आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ
दाहोदमधील जेतपूर, सांखेडा तर छोटाउदयपूर हे मतदारसंघासाठी आदिवासींसाठी राखीव आहेत. यातील छोटाउदयपूर आणि जेतपूर मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. तर सांखेडा मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. मागील दोन निवडणुकांपासून विरोधी पक्षनेते सुखराम राठवा हे जेतपूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर मोहनसिंह राठवा छोटा उदयपूरचे आमदार आहेत. दोन्ही नेते काँग्रेसचे वरिष्ठ तसेच अनुभवी आदिवासी नेते आहेत. परंतु समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
भाजपवर केला आरोप
सत्तारुढ पक्ष भाजपने सहकार क्षेत्रातील नेते उमेश शाह यांना धमकाविण्यासाठी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप सुखराम राठवा यांनी केला आहे. भाजपमध्ये सामील न झाल्यास तुरुंगात पाठवू अशी धमकी शाह यांना मिळाली असावी असा दावा काँग्रेस आमदाराने केला आहे.
कुठलाही दबाव नाही
कुठलीही शासकीय यंत्रणा किंवा विभागाचा दबाव नव्हता. काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असताना माझ्या कुटुंबातील सदस्याला भाजप सरकारने महत्त्वाच्या पदावर नियुक्त केले होते. भाजपने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर विश्वास दाखविला होता, याचमुळे मी भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसबद्दल माझी कुठलीच तक्रार नसल्याचे उमेश शाह यांनी म्हटले आहे.