‘टॉप टेन’मध्ये विद्यार्थ्यांची बाजी ः मुलींमध्ये तनिष्का काबरा आघाडीवर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जेईई ऍडव्हान्स 2022 चा निकाल रविवारी जाहीर झाला. या निकालात आयआयटी बॉम्बे झोनचा आर. के. शिशिर हा उमेदवार कॉमन रँक लिस्टमध्ये (सीआरएल) अव्वल आहे. शिशिर हा कर्नाटक-बेंगळूरस्थित असून त्याला 360 पैकी 314 गुण मिळाले. कॉमन रँक लिस्टमध्ये टॉपर्स ठरलेल्या शिशिर याच्यापाठोपाठ पोलू लक्ष्मी साई लोहित रेड्डी याला दुसरे तर थॉमस बिजू चिरमवेली याला तिसरे स्थान मिळाले. तर आयआयटी दिल्लीची तनिष्का काबरा ही महिला उमेदवारांमध्ये अव्वल ठरली आहे. पण तिचे ‘सीआरएल’ 16 इतके आहे. तिने 360 पैकी 277 गुण मिळवले. जेईई ऍडव्हान्स 2022 मध्ये रँक मिळवणाऱया उमेदवारांना 12 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया जेओएसएसए समुपदेशनासाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
निकालासोबतच अंतिम उत्तरपत्रिकाही जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी आपले अंतिम उत्तरपत्रिका आणि स्कोअर कार्ड अधिकृत वेबसाईटवर तपासू शकतात. यावषी 1,60,038 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 1,55,538 विद्यार्थ्यांनी दोन्ही पेपर दिले. त्यापैकी 40,712 पात्र ठरले. ही परीक्षा 28 ऑगस्ट रोजी झाली होती. आता सोमवारपासून समुपदेशन प्रक्रिया सुरू होणार आहे. जेईई ऍडव्हान्स 2022 कॉमन रँक लिस्टमध्ये वंगापल्ली साई सिद्धार्थ (चौथा), मयंक मोटवानी (पाचवे), पॉलिसेट्टी कार्तिकेय (सहावे), प्रतीक साहू (सातवे), धीरज कुरुकुंड (आठवे), महित गढीवाला (नववे) आणि वेचा ज्ञान महेश (दहावे) अशी क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. ‘टॉप 10’मध्ये आयआयटी मद्रास झोनच्या पाच उमेदवारांचा समावेश आहे.