Tarun Bharat

मडगावात एका मद्यपीने केला दुसऱयाचा खून

Advertisements

पोटातील आतडय़ा काढल्या बाहेर , क्रूरतेचे दर्शन

प्रतिनिधी/ मडगाव

दारुच्या नशेत झालेल्या हाणामारीत झारखंडच्या एका इसमाचा त्याच्याच सहकाऱयाने मडगावात खून केला. पोलिसांनी आरोपीला अवघ्या 4 तासात अटक केल्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे. मयताचे नाव अमित किरकेट्टी (35) असे असून तो मूळ झारखंड राज्यातील आहे, तर आरोपीचे नाव प्रशांत बर्ना (26) असे असून आरोपीही झारखंड राज्यातील आहे. ओल्ड गोवा येथे प्राध्यापिकेच्या झालेल्या खुनाच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले असताना दुसऱया दिवशी मडगाव येथे झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान,  ताळगाव येथे शेतात एका नेपाळीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडला आहे. तसेच शिवोली-हुडोबीच येथे बिहारी युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला असल्याने पोलिसांसमोर आव्हान आहे.  

या प्रकरणी दक्षिण गोव्याचे पालीस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी सविस्तर माहिती दिली. मडगावच्या फ्लाय ओव्हर पुलाजवळ एमएच-06-बीडब्ल्यू-5596 क्रमांकाचे एक वाहन उभे होते. शुक्रवारी सायंकाळी या वाहनाचा चालक सलमान काणेकर याने हे वाहन पार्क करुन ठेवले होते. दुसऱया दिवशी म्हणजे शनिवारी 25 रोजी सकाळी चालक या वाहनाजवळ आला तेव्हा सहज म्हणून त्याने  सामान ठेवण्याच्या जागेत डोकावून पाहिले असता त्याला तेथे एक नग्नावस्थेत मृतदेह असल्याचे आढळले.

काणेकर याने याची खबर ताबडतोब मडगाव पोलिसांना दिली. मडगावचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्यासह मडगाव पोलीस व इतर पोलीस अधीकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पाहणीत एका अज्ञात आरोपीने मयताचा खून केला होता. मयताच्या पोटातील आतडय़ा बाहेर काढलेल्या होत्या.

त्यानंतर पोलीस तपास सुरु झाला. जवळपास असलेल्या सीसीटीव्हीचा आधार घेण्यात आला. एव्हाना मयताचे नाव समजले होते, त्यावरुन तो राहत असलेले ठिकाण हुडकून काढण्यात आले. तेथे आणखी एक इसम होता. 25 रोजीची सकाळ झाली तरीही तो दारुच्या नशेत होता. आदल्या रात्रीची नशा अजून उतरलेली नव्हती. त्याला ताब्यात घेण्यात आले तेव्हा आपणच मयताला मारले असल्याची कबुली या आरोपीने मडगाव पोलिसांना दिली. खारेबांद-मडगाव येथे ही खुनाची घटना घडली. जखमी अवस्थेत हा युवक चालत त्या टेम्पोपर्यंत आल्याचे सीसीटीव्हीत आढळून आले आहे. 

मडगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिवेंदु भूसान, पोलीस अधिकारी सनी गुप्ता, फोंडा विभागाचे उपअधीक्षक चेतन पाटील, मडगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर, फातोर्डा पोलीस निरीक्षक गीरेंद्र नाईक, कोलव्याचे पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो, मायणा-कुडतरीचे पोलीस निरीक्षक मोहन गावडे, कुंकळीचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण, उपनिरीक्षक आल्वितो रॉड्रिग्स, उपनिरीक्षक विराग पवार, उपनिरीक्षक दिनेशकुमार मुखिया, उपनिरीक्षक विश्वजित ढवळीकर व अन्य पोलीस कर्मचाऱयांनी यावेळी तपास कार्यात सहभाग दाखवला.

ताळगाव येथे शेतात मृतदेह सापडला

पणजी

ताळगाव येथे शेतात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. याबाबत पणजी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेहाची ओळख पटवून घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्तीचे नाव टीकाराम बुधो ठोको (वय 40, नेपाळ) असे आहे. दोनापावला येथे तो भाडय़ाच्या खोलीत एकटाच राहत होता. त्याची बायको व मुले नेपाळमध्ये राहतात. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सध्या अनैसर्गिक मृत्यू म्हणून घटनेची नोंद केली आहे. तसेच मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठविला आहे. शवचिकित्सा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल की नेमका मृत्यू कशामुळे झाला आहे. त्यानंतर गरज पडल्यास नोंद केलेल्या तक्रारीत बदल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पणजी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

शिवोलीत आढळला बिहारी युवकाचा मृतदेह  

म्हापसा

शिवोलीतील हुडोबीच समुद्रकिनाऱयावर शनिवारी सकाळी युवकाचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती स्थानिकांनी हणजूण पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृताच्या पॅन्टच्या खिशात मिळालेल्या आधारकार्डवरील नोंदीनुसार सदर युवक त्रिपुरारी मिश्रा (21) बिहार  असा गावाचा उल्लेख असल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वेता सावळ यांनी  सांगितले.

शुक्रवारी संध्याकाळी सांज्यांव उत्सवा निमित्ताने सागरी मार्गाद्वारे शिवोली नदीच्या खाडीकडे निघालेल्या स्पर्धेतील चित्ररथावरील अनेकांनी समुद्रात तिघा तरुणांना आंघोळ करतांना पाहिल्याचे स्थानिक तरुणांनी सांगितले. सदर युवक बुडून मरण पावला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.  हणजूण पोलिसांनी पंचनामा करून सदर मृतदेह बांबोळी येथे शवागारात ठेवला आहे. पोलीस   मृताच्या कुटुंबियांच्या शोधात आहेत, असे पोलीस  उपनिरीक्षक स्नेहा सावळ यांनी सांगितले.    

Related Stories

संजीवनी साखर कारखाना बंद पडू देणार नाही-

Patil_p

दिवगाळी नार्वे येथे गव्याची गोळी झाडून हत्या

Omkar B

कर्नाटकात जाण्यासाठी पोळे चेकनाक्यावर झुंबड

tarunbharat

सत्तरीतून 400 वारकरी पंढरपूरला रवाना

Amit Kulkarni

शशिकला गोवेकर यांचा ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्याहस्ते सत्कार

Amit Kulkarni

आजपासून ‘टीका उत्सव 3.2’

Amit Kulkarni
error: Content is protected !!