मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही : मतदारांच्या इच्छा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी
प्रतिनिधी /पणजी
आपल्यासोबत राहिलेल्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. मतदारांच्या इच्छा पूर्ण करणे ही माझी जबाबदारी आहे. त्याचबरोबर यापुढे महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा गोव्यात आलेले मुख्यमंत्री शिंदे शुक्रवारी दुपारी पुन्हा मुंबईसाठी निघण्यापूर्वी पत्रकारांशी बोलत होते. मुंबईहून गोव्यात परतल्यानंतर त्यांनी पणजीतील ताज हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांसोबत भेट घेतली. त्यानंतर शुक्रवारी दुपारी ते पुन्हा मुंबईला जाण्यासाठी निघाले.
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यात तळ ठोकून आहेत. फ्लोअर टेस्ट होण्यापूर्वी ते मुंबईला निघणार आहेत. फ्लोअर टेस्ट ही केवळ औपचारिकता राहील आणि 175 आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे आम्ही सहज जिंकणार आहोत, असे शिंदे म्हणाले.
आम्ही महाराष्ट्रात इतिहास रचला : शिंदे
शिंदे गटाचा विजय हा बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्व विचारसरणीचा आणि आनंद दिघे यांच्या शिकवणीचा तसेच 50 आमदारांच्या एकजुटीचा विजय आहे. या आमदारांनी महाराष्ट्रात इतिहास रचला आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो, असे श्री. शिंदे म्हणाले.
आपण ’मातोश्री’ला भेट दिल्यास लोकांना लगेच कळेल, असे एका प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले. भाजपकडे 115 ते 120 आमदार असले तरी त्यांनी मला पाठिंबा दिला. मी मोठय़ा मनाने बाळासाहेबांचा सैनिक आहे. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानतो, असे शिंदे म्हणाले.
आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे नेत आहोत, अन्यायाविरुद्ध लढायला आणि त्याविरोधात आवाज उठवायला आनंद दिघे यांनीही शिकवले आहे. आम्ही शिवसैनिक म्हणून काम करू आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाकडे नेऊ. सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होतील, असे शिंदे यांनी सांगितले.
शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराने मंत्रीपद मागितलेले नाही : आमदार दीपक केसरकर यांची माहिती


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद भेट दिले आहे. त्यामुळे अन्य कोणत्याही आमदाराने मंत्रीपद मागितलेले नाही. एकनाथ शिंदे हे बलाढय़ नेते असून सर्व परिस्थिती हाताळण्यास समर्थ आहेत, असे निवेदन सावंतवाडीचे शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे.
शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईत आलेल्या पूराच्या पार्श्वभूमीवर तेथे होणाऱया आपत्ती व्यवस्थापन बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे दुपारी मुंबईला रवाना झाल्याची माहिती त्यांनी दिली.
कृषी क्षेत्रात क्रांती घडवणाऱया माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र दरवषी 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा करतो. महाराष्ट्रात बरेच शेतकरी आत्महत्या करतात आणि आजपर्यंत त्या आत्महत्या थांबविण्यासाठी कुणीही ते एक मिशन म्हणून स्वीकारलेले नाही. आता आम्हाला आत्महत्या थांबवायच्या आहेत आणि नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या मुलाला मुख्यमंत्री करण्याची देवाची योजना असू शकते, असे केसरकर म्हणाले.
महाराष्ट्रात 51 टक्के शहरीकरण झाले असून 49 टक्के लोक ग्रामीण भागात राहतात, त्यापैकी 80 टक्के लोक शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत. त्यासाठी कृषी उपक्रमांचे यांत्रिकीकरण होणे, उत्पादन वाढवणे, अन्न प्रक्रिया उद्योग आणणे हे पाहणे सरकारचे कर्तव्य आहे, त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यामुळे आमची लढाई स्वतःसाठी नव्हे तर ती महाराष्ट्राच्या भल्यासाठी होती, असे केसरकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ मिशनची घोषणा केली आहे. आजच्या या सर्वसमावेशक अशा ‘कृषी दिनी’ त्यांनी आत्महत्येचे डाग धुण्याची घोषणा केली. शेतकऱयांना केवळ कर्जमाफी करून होणार नाही, तर त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, असे ते म्हणाले.