ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडलं. 2 मार्चला या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. मात्र, मतमोजणी आगोदरच कसब्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचा दावा उत्साही कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री धंगेकर यांच्या विजयाचे बॅनरही झळकवले.
पुण्यातील स्वारगेट, वडगाव यासह अन्य भागात हे बॅनर लावण्यात आले होते. “आपल्या हक्काचा माणूस… रवींद्र धंगेकर यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन”, असा उल्लेख या बॅनरवर होता. त्यामुळे निकालाआधीच धंगेकर हे विजयी झाले का? अशी चर्चा सोशल मीडीयावर रंगू लागली. त्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी उत्साही कार्यकर्त्यांना आवर घालत अवघ्या दोन तासात हे बॅनर हटवले.
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा विधानसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली. भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात ही प्रमुख लढत झाली. या निवडणुकीसाठी रविवारी 50.06 टक्के मतदान झालं. 2,75,679 मतदारांपैकी 1,38,018 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी 74,218 पुरुष आणि 63,800 महिलांचा समावेश होता.