Tarun Bharat

शिरोळमध्ये पक्षीय कमी, गटातटाचे राजकारण अधिक

खासदार माने यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने उचललेले पाऊल का?

शिरोळ / बाळासाहेब माळी

शिरोळ तालुक्यामध्ये पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाचे राजकारण अधिक आहे. खासदार धैर्यशील माने हे शिवसेनेचे बंडखोर नेते, मुख्यमंत्री शिंदे गटाबरोबर गेल्याने आगामी लोकसभा निवडणुकीची गोळाबेरीज करण्यात ते यशस्वी झाल्याची चर्चा तालुक्यात आहे. पण त्यांच्या बंडाने राजकीय समिकरणे बदलण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

शिरोळ तालुक्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील व शिरोळचे माजी मंत्री, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील भाजपचे अनिलराव यादव असे गट आहेत. गत लोकसभा निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांचा शिवसेनेच्या खासदार धैर्यशील माने यांनी पराभव केला होता. माजी खासदार राजू शेट्टींनी तिकीट वाटपात केलेली चूक अन् त्यामुळे त्यांना शिरोळ या त्यांच्या बालेकिल्ल्यातून त्यांना विरोध झाला होता. या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने व पंतप्रधान मोदींच्या लाटेत धैर्यशील माने यांनी मोठय़ा मताधिक्याने शेट्टींचा पराभव केला. खासदार मानेंच्या विजयात माजी आमदार उल्हास पाटील, भाजप, शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
खासदार माने यांनी शिंदे गटात सहभागी होऊन आगामी लोकसभा निवडणुकीत गोळा बेरजेचे राजकारण केले आहे. शिंदे व भाजप युतीमुळे जिह्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार डॉ. विनय कोरेंसह अन्य नेतेमंडळांची साथ मिळेल व आपला आगामी मार्ग सुकर होईल, या हेतूने शिंदे गटाबरोबर ते राहिल्याची चर्चा आहे.

तालुक्यात भाजप शिवसेनेमध्ये अंतर्गत जुना-नवा वाद व काही अंशी धुसफुस आहे. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना अशी महाविकास आघाडी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचे संकेत माजी खासदार शेट्टी यांनी नुकतेच दिले आहेत. यावरून तालुक्यात आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विरोधात काँग्रेसचे गणपतराव पाटील, शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यापैकी एकाला उमेदवारी दिल्यास लढत अटीतटीची होणार आहे. एकंदरीत पक्षीय राजकारण कमी अन् गटातटाचे राजकारण अधिक असल्याने कोण कुठे गेला, याबाबत फारशी चर्चा सध्यातरी नाही. खासदार माने यांनी आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीची आखणी केल्याची जोरदार चर्चा मात्र तालुक्यात आहे.

Related Stories

Kolhapur; बिद्री ‘च्या सहवीज प्रकल्पाला राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : उघड्यावर कचरा टाकण पडलं पाच हजारांना

Archana Banage

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक पलटी, चालक जखमी

Archana Banage

आंदोलन अंकुश, जयशिवराय संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड

Archana Banage

सातारा- कागल महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम दिवाळीला सुरू

Abhijeet Khandekar

कोल्हापुरी गुळाला ‘ग्लोबल’ झेप घेण्याची संधी

Archana Banage
error: Content is protected !!