तेलंगणात टीआरएस ः बाहुबली अनंत सिंहच्या पत्नीचा बिहार-मोकामामध्ये विजय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील 6 राज्यांतील 7 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांसाठी मतमोजणी रविवारी झाली. उत्तर प्रदेशातील गोला गोकर्णनाथ, बिहारमधील गोपालगंज, ओडिशामधील धामनगर आणि हरियाणातील आदमपूर हय़ा चार जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले. याचदरम्यान आरजेडीच्या उमेदवार आणि बाहुबली अनंत सिंह यांच्या पत्नी नीलम देवी यांनी बिहारमधील मोकामा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. दुसरीकडे तेलंगणात टीआरएस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत झाली. सर्व जागांसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते.
लखीमपूर खेरीतील गोला गोकर्णनाथ जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अमन गिरी यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी सपा उमेदवार विनय तिवारी यांचा 34,298 मतांनी पराभव केला. हा विजय मिळविताना अमन गिरी यांनी आपले वडील अरविंद गिरी यांचा विक्रमही मोडला आहे. अरविंद गिरी यांनी 29,294 मतांच्या फरकाने सपाचे उमेदवार विनय तिवारी यांचा पराभव केला होता.
हरियाणात आदमपूरमध्ये भाजपची बाजी
हरियाणातील हिसार जिह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार भव्य बिश्नोई 16,606 मतांनी विजयी झाले. विजयाची माहिती मिळताच भव्य यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. गेल्या वेळी त्यांचे वडील कुलदीप बिश्नोई येथून विजयी झाले होते. मात्र, त्यांनी काँग्रेस सोडल्यानंतर राजीनामा दिला. त्यानंतर ही पोटनिवडणूक घ्यावी लागली.
बिहारमध्ये आरजेडी-भाजपला 1-1
बिहारमधील पोटनिवडणुकीत महाआघाडी आणि भाजप यांच्यात तुल्यबळ लढत होती. मोकामामध्ये आरजेडीचा उमेदवार तर गोपालगंजमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. मोकामा येथे बाहुबली अनंत सिंह यांच्या पत्नी नीलम देवी यांनी भाजपच्या सोनम देवी यांचा 16,707 मतांनी पराभव केला. येथे आरजेडीला 79,646 आणि भाजपला 62,939 मते मिळाली. गेल्या वेळी विजयाचे अंतर कमी झाले आहे. गोपालगंजमध्ये भाजपच्या कुसुम देवी यांनी शेवटच्या फेरीत आरजेडीच्या मोहन गुप्ता यांचा 2,183 मतांच्या फरकाने पराभव केला. शेवटच्या फेरीपर्यंत येथे चुरशीची स्पर्धा होती. गोपालगंजमध्ये भाजपच्या कुसुम देवी सुरुवातीपासून आघाडीवर होत्या.
तेलंगणातील मुनुगोडे येथे टीआरएसचा संघर्षमय विजय
तेलंगणातील मुनुगोडे विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात सत्ताधारी टीआरएसने चौथ्या फेरीत आघाडी घेतली आहे. या दृष्टिकोनातून टीआरएस आणि भाजप यांच्यात तीव्र संघर्ष दिसून आला. येथे टीआयएसच्या कुसुकुंतला प्रभाकर रेड्डी यांनी विजय संपादन केला आहे.
ओडिशातील धामनगरमध्ये भाजपची सरशी
ओडिशातील धामनगर विधानसभा मतदारसंघातून भाजप सुरुवातीला आघाडीवर होता. भाजपचे आमदार बिष्णू चरण सेठी यांच्या निधनामुळे या जागेवर पोटनिवडणूक झाली. दिवंगत आमदार बिष्णू चरण सेठी यांचे पुत्र सूर्यवंशी सूरज यांना भाजपने येथून उमेदवारी दिली. त्याच वेळी बीजेडीने अबंती दास यांना येथे उमेदवार केले होते. या दोघांमधील लढाईत भाजपच्या सूर्यवंशी सूरज यांनी विजयाला गवसणी घातली.