काँग्रेस 4, टीएमसी 4, भाजपला 2 जागा : आप, द्रमुक आणि अपक्षांना प्रत्येकी 1 जागा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सात राज्यांतील 13 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. ‘इंडिया’ म्हणजेच विरोधी आघाडीच्या उमेदवारांनी 13 पैकी 10 जागा जिंकल्या आहेत. तर हिमाचल आणि मध्यप्रदेशमध्ये भाजपने प्रत्येकी एक जागा जिंकत दोन जागांवर विजय मिळवला. तर, बिहारमध्ये अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे.
विधानसभेच्या 13 जागांसाठी बुधवारी (10 जुलै) मतदान झाले. त्यापैकी सर्वाधिक चार जागा पश्चिम बंगालच्या होत्या. त्याचवेळी हिमाचल प्रदेशातील तीन आणि उत्तराखंडमधील दोन जागांचेही निकाल जाहीर झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच निवडणुका झाल्या आहेत. 13 जागांवर लढणाऱ्या सर्व 121 उमेदवारांचे भवितव्य उलगडले आहे. या निवडणुकीत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गज आणि काही नवीन चेहऱ्यांनी नशीब आजमावले.
निवडणूक आयोगाने सर्व 13 जागांचे निकाल अधिकृतपणे जाहीर केले आहेत. यामध्ये पंजाबमधील जालंधर पश्चिम मतदारसंघातून आपचे मोहिंदर भगत विजयी झाले आहेत. हिमाचल प्रदेशच्या देहरामधून काँग्रेसचे कमलेश ठाकूर, नालागढमधून काँग्रेसचे हरदीप सिंग बावा आणि हमीरपूरमधून भाजपचे आशिष शर्मा विजयी झाले आहेत. पश्चिम बंगालमधील सर्व जागा टीएमसीच्या खात्यात गेल्या आहेत. येथे रायगंजमध्ये कृष्णा कल्याणी, बागडामध्ये मधुपर्णा ठाकूर, राणाघाट दक्षिणमध्ये मुकुटमणी अधिकारी आणि माणिकतलामध्ये सुप्ती पांडे विजयी झाल्या आहेत. मध्यप्रदेशातील अमरवाडा मतदारसंघातून भाजपचे कमलेश प्रताप शहा विजयी झाले आहेत. उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे लखपत सिंग बुटोला यांनी बद्रीनाथची जागा जिंकली असून काँग्रेसचे काझी मोहम्मद निजामुद्दीन यांनी मंगळूरची जागा जिंकली आहे. बिहारमधील ऊपौली मतदारसंघातून एलजेपी (रामविलास) बंडखोर म्हणून निवडणूक लढवलेले शंकर सिंह विजयी झाले आहेत. तामिळनाडूतील विक्रवंडी विधानसभा मतदारसंघात द्रमुकचे अन्नयुर सिवा विजयी झाले आहेत.
10 जुलै रोजी सात राज्यांतील 13 विधानसभा जागांवर शांततापूर्ण पोटनिवडणूक पार पडली. पंजाबच्या एका विधानसभेच्या जागेवर, उत्तराखंडच्या दोन, हिमाचल प्रदेशच्या तीन, पश्चिम बंगालच्या चार आणि बिहार, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूच्या प्रत्येकी एका विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक झाली.
विधानसभेच्या 13 जागांवरील स्थिती
राज्य मतदारसंघ विजयी पक्ष
बिहार ऊपौली अपक्ष
मध्यप्रदेश अमरवाडा भाजप
पंजाब जालंधर पश्चिम आप
तामिळनाडू विक्रवंडी द्रमुक
उत्तराखंड बद्रीनाथ काँग्रेस
उत्तराखंड मंगळूर काँग्रेस
हिमाचल प्रदेश देहरा काँग्रेस
हिमाचल प्रदेश हमीरपूर भाजप
हिमाचल प्रदेश नालागढ काँग्रेस
पश्चिम बंगाल रायगंज टीएमसी
पश्चिम बंगाल राणाघाट दक्षिण टीएमसी
पश्चिम बंगाल बागडा टीएमसी
पश्चिम बंगाल माणिकतला टीएमसी