नवी दिल्ली
ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपनी आयशर मोटर्सने आगामी काळात स्पेनमधील स्टार्क फ्युचरमध्ये 440 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. स्टार्क फ्युचर ही इलेक्ट्रिक मोटरसायकल बनविणारी कंपनी आहे. याअंतर्गत दोन्ही कंपन्या आगामी काळात इलेक्ट्रिक मोटारसायकली बाजारात आणण्याची योजना बनवत असल्याचे सांगितले जाते.
स्टार्क फ्युचरमध्ये कंपनीने 10 टक्के इतका वाटा हस्तगत करण्याचे निश्चित केले आहे. रॉयल इनफिल्डची निर्मिती करणारी आयशर मोटर्स कंपनीची स्टार्कसोबत नुकतीच बैठक पार पडली असता त्यात गुंतवणूकीचा निर्णय आयशरने अंतिम केला आहे. या भागीदारीच्या माध्यमातून आयशर कंपनीला इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या संशोधन व विकासात अधिक सक्रीय होता येणार आहे. आगामी काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असल्याने स्टार्कसोबतची भागीदारी भविष्यात फार महत्त्वाची ठरणार असल्याचेही आयशरकडून सांगण्यात आले आहे.