बेळवीत उभारली सुसज्ज गो-शाळा, भाकड जनावरांचा प्रश्न मार्गी; जनावरे कत्तलखान्याकडे पाठविण्याच्या प्रकाराला बसणार चाप
बेळगाव : भाकड काळातील जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उभारण्यात आलेली गो-शाळा जनावरांच्या सेवेत दाखल झाली आहे. हुक्केरी (ता. बेळवी) येथे उभारण्यात आलेल्या सरकारी गो-शाळेत जनावरे दाखल होवू लागली आहेत. त्यामुळे भाकड काळातील जनावरांच्या संगोपनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक सरकारी गो-शाळा उभारली जात आहे. बेळगाव जिल्ह्यात बेळवी या ठिकाणी तब्बल 19.4 एकर क्षेत्रात ही गोशाळा उभारण्यात आली आहे. त्यामुळे या गो-शाळेत भाकड काळातील जनावरांचे संगोपन होणार आहे. त्यामुळे आता भाकड जनावरांची चिंता मिटली आहे. जिल्ह्यातील दूध क्षमता कमी झालेल्या म्हणजेच भाकड काळातील जनावरांना या गो-शाळेत प्रवेश दिला जात आहे. कोरोना आणि लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे गो-शाळेचे काम काहीसे लांबणीवर पडले होते. मात्र आता गो-शाळेचे काम पूर्ण झाले आहे. शिवाय जनावरांचा प्रवेश देखील सुरू झाला आहे. जिल्ह्यात 16 लाख जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस आणि बैलांचा समावेश आहे. दरम्यान, भाकड जनावरांची संख्यादेखील अधिक आहे. अशा जनावरांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण होतो. दरम्यान काही जनावरे कत्तलखान्याकडे पाठविली जातात. या प्रकारालादेखील आता आळा बसणार आहे. य् ाा गो-शाळेत तब्बल 500 जनावरांची क्षमता असणारा गोठा बांधण्यात आला आहे. शिवाय तज्ञ पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गो-शाळेतील जनावरांना तातडीने उपचारदेखील होणार आहेत. या गो-शाळेत गो वर्गीय जनावरांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे भाकड गायी आणि बैलांचे संवर्धन होणार आहे.
विशेषत: आजारी आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या जनावरांनादेखील या गो-शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय आजारी जनावरांवर तातडीने उपचार होणार आहेत. हा सारा खर्च पुण्यकोटी योजनेंतर्गत केला जाणार आहे. या योजनेला समाजातील विविध संस्था आणि दानशूर व्यक्तींचा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे समाधानकारक रक्कम जमा झाली आहे. ही सर्व रक्कम आता गो-शाळेतील जनावरांवर खर्च केली जाणार आहे. या गो-शाळेत गोठा, पाण्याचे हौद, लाईट, फॅनसह इतर सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर खाद्य ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यामुळे ज्या पशुपालकांना आपली भाकड जनावरे द्यायची आहेत, त्यांनी गो-शाळेत आणून द्यावीत किंवा जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहनही पशुसंगोपन खात्याने केले आहे. गो-शाळेतील जनावरांच्या शेणापासून सेंद्रीय खतनिर्मिती केली जाणार आहे. गोमुत्रापासूनदेखील औषधे बनविली जाणार आहेत. त्यामुळे गो-शाळेला उत्पन्नही प्राप्त होणार आहे. तसेच जनावरांपासून मिळणाऱ्या दुधापासून उपपदार्थ तयार केले जाणार आहेत
जनावरांना पुरविणार आरोग्य सेवा
जिल्ह्यात सहा ठिकाणी गो- शाळा उभारल्या जाणार आहेत. यापैकी बेळवी येथील गो-शाळेचे काम पूर्ण झाले असून, जनावरांना प्रवेश दिला जात आहे. या ठिकाणी जनावरांच्या संगोपनाबरोबर त्यांना आरोग्याच्या आणि इतर सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
– डॉ. राजीव कुलेर सहसंचालक पशु संगोपन खाते