प्रतिनिधी/ बेळगाव
विश्वकर्मा केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून भारतीय कला, संस्कृती, तंत्रज्ञान यांचे प्रतिक आहेत, असे मत निवृत्त प्राचार्य श्रीकांत पत्तार यांनी व्यक्त केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व संस्कृती खाते यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार गंधर्व रंगमंदिर येथे विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
विश्वकर्मा यांनी अपार ज्ञानाने अनेक नवनवीन गोष्टींचा प्रामुख्याने आयुधांचा शोध लावला. त्यामुळे या दिवशी सर्व यंत्रे, उपकरणे यांची पूजा केली जाते, असे ते म्हणाले. तत्पूर्वी विश्वकर्मा यांच्या भावचित्रांसह ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मिरवणुकीचे उद्घाटन केले.
कालिकादेवी भजनी मंडळ व नयना गिरीगौडर यांच्या समुहाने संगीत कार्यक्रम सादर केला. याप्रसंगी कन्नड व संस्कृती खात्याच्या साहाय्यक संचालिका विद्यावती बजंत्री यांनी स्वागत केले. डॉ. प्रताप यांनी सूत्रसंचालन, कल्लाप्पा बडीगेर यांनी आभार मानले. याप्रसंगी बेंगळूर ललित कला अकादमीचे इरण्णा अर्कसाली, भरतेश शिरोळकर, राघवेंद्र पत्तार, मलगौड पाटील व समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.