ऑनलाईन टीम/तरुण भारत
दलित मुलावर हल्ला करून आरोपीचे पाय चाटत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे मंगळवारी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका दलित तरुणाला मारहाण, अपमानित आणि आरोपींपैकी एकाचे पाय चाटण्यात आल्याचे दाखविल्यानंतर आठ तरुणांना अटक करण्यात आली.
या व्हिडिओमध्ये दलित समाजातील हा मुलगा जमिनीवर बसलेला असून त्याचे हात त्याच्या कानावर आहेत. शिक्षा म्हणून त्याला असं बसण्यास भाग पाडल्याचं समोर येतयं. आरोपी मोटारसायकलवर बसलेला आहे. आरोपी बरोबरचे इतर तरुण हसत आहेत. त्यांच्या हसण्याचा आवाज येतोय. तर पीडीत मुलगा भीतीने थरथरतोय. एक आरोपी त्या मुलाला. “ठाकूर’ म्हणण्यास डिवचत आहे. पीडीत मुलगा हा दहावीचा विद्यार्थी आहे. तर आरोपी हे त्याच्याच शाळेतील माजी विद्यार्थी आहेत.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना 10 एप्रिल रोजी घडली होती परंतु रविवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दहावीचा विद्यार्थी असलेल्या किशोरने केलेल्या तक्रारीच्या आधारे त्याच दिवशी एफआयआर दाखल केला आहे.
मंगळवारी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना या पीडित मुलाने सांगितले की, “एक मुलगा 10 एप्रिल रोजी माझ्या घरी आला आणि मला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला त्याठिकणी अन्य सात जण होते. मी सातपैकी एकालाही ओळखले नाही. त्यांनी मला मारहाण करून अपमानित केले. मी त्यांना ओळखत नाही आणि त्यांनी माझ्यावर हल्ला का केला हे मला माहीत नाही. मला मारहाण केल्यानंतर त्यांनी मला तिथेच सोडले आणि नंतर काही लोकांनी माझी सुटका केली.
स्थानिक पोलीस स्टेशनचे एसएचओ हरिकेह सिंह म्हणाले, “आम्ही आठही आरोपींना अटक केली आहे. काही आरोपी अल्पवयीन आहेत. आम्ही कागदपत्रांची व्यवस्था करत आहोत आणि त्यानुसार पुढील कार्यवाही करू. मुलांमधील वैमनस्यातून ही घटना घडली. प्राणघातक हल्ल्यासाठी आयपीसी कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे, तर एससी आणि एसटी (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याचीही मागणी करण्यात आली आहे.