प्रतिनिधी /वास्को
वास्को परीसरात काल दिवसभरात बराच पाऊस पडला. पाऊस व वाऱयामुळे तीन वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनाही घडल्या तर एका घरावरही वृक्षाची फांदी कोसळली. घराचे नुकसान होण्याबरोबरच पिंपळ वृक्षाखाली दोन वाहनेही चिरडली.
वास्को परीसरात शुक्रवारी दिवसभरात समाधानकारक पाऊस पडला. पावसाबरोबर काही प्रमाणात वाराही वाहात होता. त्यामुळे हेडलॅण्ड सडा जेटी भागातील हनुमान मंदिराजवळील मुख्य मार्गावर सध्याकाळी चारच्या सुमारास एक जुनाट पिंपळ वृक्ष कोसळला. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मात्र, तेथील रस्त्याशेजारी पार्क केलेल्या दोन दुचाक्या या वृक्षाखाली चिरडल्याने या वाहनांचे नुकसान झाले. या मार्गावरील वाहतुकीचीही बराच वेळ कोंडी झाली. मेस्तावाडा भागातील मुख्य रस्त्यावरही एक जुना वृक्ष कोसळल्याने अडचण निर्माण झाली. त्याच प्रमाणे मांगोरहिल भागातील कोमुनिदाद इमारतीसमोरील मार्गावरही एक वृक्ष कोसळला. वाडे भागातील एका घरावर वृक्षाची फांदी कोसळण्याचीही घटना घडली. या घटनेत घराचे नुकसान झाले. वास्कोतील अग्नीशामक दलाने घटनास्थळी धाव घऊन कोसळलेले वृक्ष हटवून रस्ते मोकळे केले.