मुख्यमंत्री राहणार उपस्थित : तब्बल 30 कोटी खर्चून सुसज्ज उभारणी
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटीअंतर्गत मध्यवर्ती बसस्थानकात सुसज्ज बसस्थानक उभारण्यात आले आहे. या बसस्थानकाचा उद्घाटन समारंभ मंगळवार दि. 27 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी परिवहन मंत्री श्रीरामुलू यासह आमदार अनिल बेनके व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तब्बल 30 कोटींचा निधी खर्चून सुसज्ज बसस्थानक उभारण्यात आले आहे. शिवाय बसेससाठी भव्य फलाट उभारला गेला आहे. त्यामुळे एकाच छताखाली शेकडो बस थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बसस्थानकात अंतर्गत फर्निचर, फरशी आणि इतर सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. 2016 मध्ये या बसस्थानकाच्या कामाला प्रारंभ झाला होता.
मध्यंतरी कोरोनामुळे बसस्थानकाचे काम काहीसे लांबणीवर पडले होते. आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, विधिमंडळासाठी बेळगावात दाखल झालेल्या मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत हा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे.