विविध अनुदानातून साडेबारा कोटीच्या विकासकामांना आमदारांच्या हस्ते चालना
प्रतिनिधी /बेळगाव
उत्तर मतदार संघातील विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी 12 कोटी 60 लाखाचा विकासकामांचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. यावेळी कपिलेश्वर उड्डाणपुलाशेजारील सर्व्हिस रस्त्याच्या विकासाचे भूमिपूजन करण्यात आले. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजुच्या रस्त्यावर पेव्हर्स घालणे तसेच डेनेज वाहिन्या व गटारीचे बांधकाम करण्यासाठी 15व्या वित्त आयोग अनुदानातून 1 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
कपिलेश्वर उड्डाणपुलाशेजारी सर्व्हिस रस्त्याचे घोंगडे अनेक वर्षापासून भिजत पडले होते. मात्र मागील आठवडय़ात येथील मालमत्ता हटवून सर्व्हिस रस्ता करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. दोन्ही बाजुच्या गटारी बांधणे तसेच ड्रेनेजवाहिन्या घालणे अशा विविध कामांकरीता 1 कोटी 60 लाखाचे अनुदान महापालिकेच्या निधीतून मंजूर करण्यात आले आहे. शनिमंदिर ते कपिलेश्वर मंदिरपर्यंतच्या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ मंगळवारी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते. तसेच डेकोरेटीव्ह लाईट्स, रस्त्यांचा विकास, नाला बांधकाम व एससीएसटी वसतीमधील विकासासाठी 3 कोटीचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
बुडाच्या निधीतून रामतिर्थनगरमध्ये लाईट्स-उद्यानाचा विकास
त्याचप्रमाणे बुडाच्या 8 कोटी निधीतून रामतिर्थनगर परिसरात डेकोरेटीव्ह लाईट्स आणि उद्यानाच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम आणि उद्यानाचा विकास करण्यात येणार आहे. अशा विविध कामांचे भूमिपूजन मंगळवारी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व विकासकामे व्यवस्थित करण्यात यावीत व नागरिकांना कोणत्याच अडचणी भासणार नाहीत याची दक्षता घेण्याची सूचना कंत्राटदारांना आणि अधिकाऱयांना आमदार बेनके यांनी केली.