संयोजन समिती अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांची माहिती
प्रतिनिधी/ चिपळूण
येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्यावतीने 5 ते 8 फेब्रुवारीदरम्यान आयोजित पर्यटन, लोककला, सांस्कृतिक, खाद्य महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाला येण्यास संमती दिली असल्याची माहिती महोत्सवाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, 5 फेबुवारी रोजी श्री जुना कालभैरव मंदिर ट्रस्ट अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानात सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यटन, लोककला, सांस्कृतिक, खाद्य महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनापूर्वी सकाळी 8 वाजता शहरात कोकणातील विविध कलाकार, नागरिक व विद्यार्थ्यांची शोभायात्रा निघणार आहे. महोत्सवाच्या मंडपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नटराज आणि श्रीदेवी विंध्यवासिनीच्या मूर्तींचे पूजन करून उद्घाटन होणार आहे. तालुक्यातील शिरगावचे शिल्पकार संदीप ताम्हणकर यांनी या मूर्ती साकारलेल्या असून महोत्सवानंतर त्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.
’लोटिस्मा’ने उभारलेल्या व्यक्तीचित्र कलादालनालाही मुख्यमंत्र्यांनी भेट द्यावी अशी इच्छा पालकमंत्र्यांनी व्यक्त करताच मुख्यमंत्र्यांनी होकार दिला असून ते कलादालनाला भेट देणार आहेत. पालकमंत्र्यांनी हा महोत्सव भव्य प्रमाणात व्हावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दहा वर्षांपूर्वी चिपळूणला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाही सामंत यांनी भरभरून सहकार्य केले होते. आता हा महोत्सवही त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी होईल अशी भावना महोत्सवाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष चोरगे यांनी व्यक्त केली.
यावेळी महोत्सवाचे समन्वयक प्रकाश देशपांडे, डॉ. यतीन जाधव, प्रा. संतोष गोनबरे, धीरज वाटेकर आदी उपस्थित होते.