सांकवाळ येथे तात्पुरता पॅम्पस : गोमंतकीय विद्यार्थ्यांना 20 टक्के जागा
प्रतिनिधी /पणजी
राज्यात लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कायदा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असून तेथील 20 टक्के जागा केवळ गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. बार काऊन्सिल ऑफ इंडिया ट्रस्टच्या ’पर्ल फर्स्ट’ उपक्रमांतर्गत इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्च (आयआययूएलईआर) यांच्यातर्फे या विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. या विद्यापीठाच्या तात्पुरत्या कॅम्पसचे उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते आज दि. 9 जून रोजी सांकवाळ येथे होणार आहे.
पणजी आयोजित पत्रकार परिषदेत बार काऊन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी ही माहिती दिली. आज सायंकाळी 4.30 वाजता होणाऱया उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती एम एम सुंदरेश तर सन्माननीय अतिथी सूर्यकांत उपस्थित राहणार आहेत.
धारबांदोडा येथे 50 एकर जमिनीत साकारणार पॅम्पस
या विद्यापीठासाठी धारबांदोडा येथे 50 एकर जागा देण्यात आली आहे. मात्र तेथील कायमस्वरूपी कॅम्पस तयार होईपर्यंत सांकवाळ येथे तात्पुरत्या कॅम्पसमधून हे विद्यापीठ कार्यरत राहील. या विद्यापीठात गोव्यातील विद्यार्थ्यांना 20 टक्के जागा राखीव असतील तर 80 टक्के प्रवेश देशाच्या अन्य भागातील विद्यार्थ्यांना देण्यात येतील, अशी माहिती मिश्रा यांनी दिली.
आयआययूएलईआर ही जागतिक दर्जाची आणि देशातील पहिली आंतरराष्ट्रीय कायदा शिक्षण संस्था आहे. सांकवाळ येथे बिटस् पिलानीच्या गोवा कॅम्पसजवळ सुरू करण्यात येणारे संस्थेचे सध्याचे केंद्र हे तात्पुरते असले तरीही तेथे जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध असतील. त्यात स्मार्ट क्लासरूम्स, जागतिक दर्जाचे वाचनालय आणि विद्यार्थी तसेच प्राध्यापक दोघांसाठी एसी खोल्या, स्विमिंग पूल, जिम, हायजिनिक फूड कोर्ट, लॉन्ड्री आणि सुरक्षा या सुसज्ज सुविधा असतील, असे मिश्रा यांनी सांगितले.
गोवा हे भारतातील खरे आंतरराष्ट्रीय आणि कॉस्मोपॉलिटन हब असल्यामुळे या विद्यापीठासाठी आम्ही गोव्याची निवड केली आहे. गोव्याला ’नॉलेज हब’ म्हणून विकसित करण्याच्या गोवा सरकारच्या इच्छेमुळे आम्हालाही प्रोत्साहन मिळाले, असेही मिश्रा यांनी पुढे सांगितले.