निलजीवासियांची कौतुकास्पद कामगिरी
प्रतिनिधी /बेळगाव
श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्रीराम मंदिर ट्रस्ट व समस्त निलजी ग्रामस्थ यांच्यावतीने बांधण्यात आलेल्या माउली सभामंडप व ट्रस्ट कार्यालयाचा उद्घाटन समारंभ रविवारी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. लक्ष्मण पाटील होते.
स्वागताध्यक्ष गोविंद मोदगेकर यांनी संस्थेच्या माध्यमातून केलेल्या कार्याची माहिती दिली. रेखा तरळे, प्रभाकर देसाई व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विठ्ठलमूर्ती पूजन सिदराय पाटील, श्रीराम-सीता पूजन भरमा गोमाण्णाचे, बाळाराम महाराज पादुका पूजन गुंडू पाटील, तुळशीपूजन लक्ष्मण गोमाण्णाचे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन स्वामी नागेश दिवटे यांच्या हस्ते करण्यात आले.
माउली सभामंडपाच्या कोनशिलेचे अनावरण राजू पाटील, बसवंत शिंदोळकर यांच्या हस्ते झाले. पूजन बसवंत पाटील यांनी केले. श्रीराम मंदिर ट्रस्ट कार्यालयाचे उद्घाटन वसुधा म्हाळोजी व परिवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभियंता मल्लेशी मुतगेकर, सुरेश भातकांडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला हातभार लावलेल्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी हभप आनंदराव पाटील यांनी श्रीराम ट्रस्ट सभासदांचे कौतुक केले. येथे भक्तीनिवास उभा करून एक वेगळा ठसा निलजीवासीयांनी उमटविला आहे, असे उद्गार काढले. यावेळी ऍड. लक्ष्मण पाटील यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. वाय. पाटील यांनी केले तर आभार सुनील पाटील यांनी मानले.