महिना अखेरीस लोकार्पण शक्मय : महांतेशनगर येथे हॉस्पिटलचे काम पूर्ण
प्रतिनिधी / बेळगाव
पशुधनाला अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकरिता महांतेशनगर येथे उभारण्यात आलेल्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले असले तरी अंतर्गत रस्त्याअभावी उद्घाटन लांबणीवर पडले आहे. कणबर्गी मुख्य रस्त्यापासून हॉस्पिटलपर्यंत अद्याप रस्ता झाला नसल्याने लोकार्पण रखडले आहे. महिनाअखेरीस रस्त्याचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर हॉस्पिटलचे लोकार्पण होईल, अशी माहिती पशुसंगोपन विभागाने दिली आहे.
जिल्हय़ात 28 लाखांहून अधिक जनावरे आहेत. त्यामध्ये गाय, म्हैस, गाढव, बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळय़ा-मेंढय़ा, डुक्कर आदींचा समावेश आहे. या जनावरांना वेळेत औषधोपचार उपलब्ध व्हावेत, याकरिता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. याठिकाणी आधुनिक यंत्रे, तज्ञ डॉक्टर आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. हॉस्पिटलचे काम एप्रिलदरम्यान पूर्ण होणार होते. मात्र प्रत्यक्षात जून उजाडला तरी अद्याप रोड आणि इतर कामे शिल्लक आहेत. त्यामुळे उद्घाटन लांबणीवर पडले आहे. जिल्हय़ात पशुवैद्यकीय डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे पशुपालकांना खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे आर्थिक भुर्दंडही बसत आहे. 5 हजार जनावरांमागे एक डॉक्टर आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात 20 हजार जनावरांमागे एकही डॉक्टर नाही. अशी बिकट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उपयुक्त ठरणार आहेत. याचबरोबरच सन्मान हॉटेलसमोरील पॉलिक्लिनिक हॉस्पिटलही मुडलगी येथे स्थलांतरित होणार आहे. त्यामुळे पशुपालकांना जनावरांच्या उपचारासाठी महांतेशनगर येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागणार आहे.