प्रतिनिधी /बेळगाव
ताज थ्रेड्स व हँडलूम गुड्स आणि यश कम्युनिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने मंगल ग्राउंड, खानापूर रोड, गोवावेस येथे सुरू करण्यात आलेल्या ’न्यू इंडियन क्राफ्ट एक्स्पो’चे उद्घाटन मंगळवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कर्नाटक राज्य हस्तकला महामंडळाचे चेअरमन मारुती अष्टगी आणि बेळगाव स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष महादेव चौगुले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी लघुउद्योग भारतीच्या समन्वयक प्रिया पुराणिक, एनआयएस कोच कुस्ती प्रशिक्षिका स्मिता पाटील, महिला हॉटेल व्यावसायिक शुभांगी भोसले, विकास कलघटगी आणि पायोनियर बँकेचे संचालक अनंत लाड आदी उपस्थित होते.
पाहुण्यांनी फीत सोडून व दीप प्रज्वलित करून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. प्रदर्शनाचे आयोजक प्रकाश कालकुंद्रीकर यांनी स्वागत केल्यावर आशुतोष शर्मा यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले.
यावेळी उद्योजक महादेव चौगुले म्हणाले, हस्तकला उद्योगात स्वतःच्या हाताने बनविलेल्या वस्तू तयार करण्यासाठी बराच वेळ लागतो. अशा प्रकारच्या प्रदर्शनाचे आयोजन करून आयोजकांनी शेकडो लोकांचा उदरनिर्वाह चालवला आहे. अशा प्रकारची प्रदर्शने आयोजित करणे हे कठीण काम आहे. बेळगावकर त्याला चांगला प्रतिसाद देतील, असा मला विश्वास वाटतो.
प्रमुख पाहुणे मारुती अष्टगी म्हणाले, करकुशल वस्तूंच्या उत्पादनांनंतर त्या कोठे विकाव्यात याची उत्पादकांना चिंता असते. पण आशुतोष शर्मांसारख्या आयोजकांनी ते काम सोपे केले असून देशाच्या विविध भागातील शेकडो व्यापारी व कारागिरांना येथे एकत्र आणले आहे. हा अत्यंत भव्य मेळावा असून व्यक्तीला स्वतःच्या घरासाठी लागणाऱया सर्व वस्तू येथे उपलब्ध आहेत. अशा प्रकारचे उपक्रम बेळगावात वारंवार व्हायला हवेत. त्यामुळे बेळगावकरांना नवनवीन व अत्याधुनिक वस्तू पाहता येतील. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही अष्टगी यांनी केले.
आजवर बेळगावात अनेक प्रदर्शने झाली, पण त्या प्रदर्शनांपेक्षा वेगळय़ा प्रकारचे हे प्रदर्शन बेळगावकरांना निश्चित आवडेल, असा विश्वास अनंत लाड यांनी व्यक्त केला. यावेळी प्रिया पुराणिक यांचेही भाषण झाले. यश कम्युनिकेशनचे विनय कदम यांनी आभार मानले. महिनाभर चालणाऱया या प्रदर्शनात देशाच्या विविध भागात हाताने तयार केलेल्या अनेक वस्तू, तसेच विविध भागातून आलेल्या क्रॉकरी व खाद्यपदार्थांचे
स्टॉल्स लावण्यात आले आहेत. याप्रसंगी सुरेश वीरगौडर, दीपक गुप्ता व अनेक मान्यवर उपस्थित होते.