पंजाब-हरियाणासह दिल्लीकरांना लाभदायी
वाराणसी / वृत्तसंस्था
हरियाणात ग्रेटर फरिदाबादमधील अमृता हॉस्पिटलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. 2 हजार 600 बेड्सच्या या रुग्णालयातील 500 बेड्सचे काम पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आले आहे. हे रुग्णालय फरिदाबाद आणि दिल्ली क्षेत्रातील लोकांना उत्कृष्ट आरोग्य सुविधा पुरविणार आहे. या इस्पितळाच्या लोकार्पणप्रसंगी हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि माता अमृतानंदमाई देवी यांनी यावेळी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कृष्ण पाल हेही उपस्थित होते.
हरियाणाबरोबरच पंजाबमधील ‘होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटर’ या रुग्णालयाचे उद्घाटनही बुधवारी करण्यात आले. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत असलेल्या टाटा मेमोरियल सेंटर या अनुदानित संस्थेने 660 कोटी रुपये खर्चून हे इस्पितळ साकारले आहे. सर्व प्रकारच्या कर्करोगावरील उपचारासाठी सर्व आधुनिक सुविधायुक्त हे रुग्णालय आहे. यामध्ये शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी आणि मेडिकल ऑन्कोलॉजी, केमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लान्टसारख्या सुविधा असून 300 बेड्सची व्यवस्था आहे.
अमृता हॉस्पिटल आधुनिक सुविधांनी सुसज्ज
अमृता हॉस्पिटलमध्ये 2,600 बेड्स असतील, ज्यात 534 क्रिटिकल केअर बेड्स असतील. रुग्णालयात 64 मॉडय़ूलर ऑपरेशन थिएटर आहेत. रुग्णालयात 800 डॉक्टरांसह 2,500 पॅरा-मेडिकल कर्मचारी कार्यरत असतील. आर्थिक दृष्टिकोनातून, रुग्णालय सुमारे 2,000 लोकांना प्रत्यक्ष रोजगार आणि आणखी 2,000 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार देईल. एकदा रुग्णालय पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर रुग्णालयात सुमारे 10,000 कर्मचारी आणि 800 हून अधिक डॉक्टर असतील, अशी सुविधा पुरविण्यात येणार आहे.
पंतप्रधानांच्या दौऱयावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. अमृता हॉस्पिटलच्या दोन किलोमीटर परिसरात पोलिसांची नाकाबंदी होती. सेक्टर-28 सह अनेक रस्ते पूर्णपणे बंद होते. समारंभासाठी विशेष आमंत्रित करण्यात आलेल्यांनाच कार्यक्रमस्थळी जाण्याची परवानगी होती. सेक्टर-28 सह ग्रेटर फरिदाबादच्या मास्टर रोडवरील वाहतूक वळविण्यात आली होती. रुग्णालयाच्या आजूबाजूच्या बहुमजली इमारतींवर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.