पशुसंगोपन खात्याची माहिती : एकाच छताखाली विविध सुविधा : लॅब, तज्ञ पशुवैद्य होणार उपलब्ध
प्रतिनिधी /बेळगाव
जनावरांना एकाच छताखाली आरोग्याच्या सुविधा उपलब्ध क्हाव्यात, यासाठी महांतेशनगर येथे उभारण्यात आलेल्या पशुवैद्यकीय मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा मंगळवार दि. 19 रोजी सकाळी 11 वाजता सुवर्णसौध येथे करण्यात येणार आहे. पशुसंगोपन मंत्री प्रभू चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. तर पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती पशुसंगोपन खात्याने दिली आहे.
जनावरांना आरोग्याच्या आधुनिक सुविधा याठिकाणी मिळाव्यात, यासाठी सुसज्ज अशा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. याठिकाणी आता जनावरांना कृत्रिम गर्भधारणा, रक्ततपासणीबरोबर अवघड शस्त्रक्रियादेखील केल्या जाणार आहेत. याबरोबर सुसज्ज अशी प्रयोगशाळा असून तज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जनावरांच्या अवघड आजारांचेदेखील निदान होणार आहे. सुसज्ज अशा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे जनावरांना वेळेत व योग्य उपचार मिळणार आहेत. या लोकार्पण सोहळय़ाला मंत्री शशिकला जोल्ले, लोकप्रतिनिधी, पोलीस आयुक्त, पशुसंगोपन खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.