केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांची उपस्थिती : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत समारोप
प्रतिनिधी /पणजी
पणजीत आयोजित करण्यात आलेल्या 9 व्या जागतिक आयुर्वेद परिषद व आरोग्य प्रदर्शनाचे केंद्रीय आयुषमंत्री सर्वानंद सोनोवाल, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आज दि. 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता येथील ’साग’ मैदानावर उद्घाटन होणार आहे. चार दिवस चालणाऱया या परिषदेचा दि. 11 रोजी समारोप होणार असून त्या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
परिषदेच्या आयोजकांतर्फे बुधवारी पणजीत पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. त्यावेळी स्वागत समिती संयोजक गिरीराज पै वेर्णेकर, आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रवीनारायण आचार्य, आयटीआरए संचालक प्रो. अनुप ठाकूर, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. त्याशिवाय आयुष एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे उपसंचालक आशुतोष श्रीवास्तव, वर्ल्ड आयुर्वेद फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. सुनील कुमार यांचीही उपस्थिती होती. चार दिवसांच्या आयोजन काळात सुमारे दोन लाख लोक या परिषदेला भेट देतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
‘एका आरोग्यासाठी आयुर्वेद’ ही मध्यवर्ती संकल्पना
‘एका आरोग्यासाठी आयुर्वेद’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या परिषदेचे जागतिक आयुर्वेद फाऊंडेशनतर्फे केंद्रीय आयुष मंत्रालय, गोवा सरकार आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे.
देशातील आघाडीच्या आयुर्वेद आरोग्य सेवा देणाऱयांच्या सहभागासह आंतरराष्ट्रीय तज्ञ आणि मान्यवरांच्या मोठय़ा सहभागामुळे परिषदेची ही आवृत्ती वेगळी ठरणार आहे. आचार्य चरकासारख्या प्राचीन ऋषींनी कल्पना केलेल्या निरोगीपणाचे तत्त्वज्ञान समाविष्ट असलेल्या या परिषदेमुळे जगभरात आयुर्वेद उत्पादने आणि सेवांच्या प्रचाराला आणखी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
जागतिक तज्ञ, विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग
11 देशांच्या प्रतिनिधींशिवाय प्रथमच संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक आरोग्य संघटनेने या परिषदेत भाग घेतला असून आयुर्वेदातील नवनवीन शोधांवर प्रकाश टाकणारी तंत्रज्ञान नवोन्मेष परिषदही आयोजित केली जाईल. देशातील विविध आयुर्वेद महाविद्यालयातील प्राचार्य आणि 247 परदेशी विद्यार्थी परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी सुमारे 500 शोधनिबंध 800 पोस्टर्स सादरीकरणासह सादर केले जातील, त्याशिवाय या परिषदेत जगभरातील सर्वोत्कृष्ट शिक्षणतज्ञ आणि तज्ञांची उपस्थिती आणि सहा पूर्ण सत्रे असतील, अशी माहिती डॉ. आचार्य यांनी दिली.
आयुर्वेद, अन्य स्वदेशी उत्पादनांचे प्रदर्शन
याच कार्यक्रमाचा भाग म्हणून या आरोग्य परिषदेत आयुर्वेद आणि इतर स्वदेशी औषध पद्धतींची सर्वोत्कृष्ट उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन केले जाईल. त्याशिवाय आयुर्वेद चित्रपट महोत्सव होणार असून सुमारे 52 प्रवेशांमधून तीन सर्वोत्कृष्ट चित्रपटांना आकर्षक पारितोषिके देण्यात येतील, असे प्रा. ठाकूर यांनी सांगितले.
रुग्णांसाठी मोफत ओपीडी
या कार्यक्रमात रुग्णांसाठी मोफत ओपीडी आयोजित केल्या जातील जेथे नाडीपरीक्षा, त्वचा, पुनर्वसन, प्रजनन क्षमता आणि इएनटी संबंधित समस्यांचे निदान करण्यात येईल, अशी माहिती पै वेर्णेकर यांनी दिली.