राजस्थानातील नाथद्वारा शहर आता लवकरच त्याच्या नव्या वैशिष्टय़ासाठी ओळखले जाणार आहे. या शहरात जगातील सर्वात उंच शिवप्रतिमेची प्राणप्रति÷ा लवकरच केली जाईल. ही प्रतिमा 351 फूट उंच असून आता लोकार्पणासाठी सज्ज झाली आहे. या प्रतिमेचे अनावरण प्रमुख रामकथा वाचक आणि तत्वज्ञ संत मुरारीबापू यांच्या हस्ते होणार आहे. मुरारीबापूंनीच या प्रतिमेची कोनशिला दहा वर्षांपूर्वी स्थानापन्न केली होती. तेव्हापासून प्रतिमा निर्माण करण्याचे काम सुरू झाले होते. 6 नोव्हेंबरला या प्रतिमेचे लोकार्पण केले जाणार आहे.
या प्रतिमेचे दर्शन तिच्यापासून तब्बल 20 किलोमीटर अंतरावरूनही होऊ शकेल. प्रतिमेच्या खांद्यापर्यंत लिफ्टने जाण्याची सोय केली जाणार आहे. या प्रतिमेच्या निर्मितीचा खर्च नाथद्वाराचे उद्योगपती आणि मिराज उद्योग समूहाचे संचालक मदन पालिवाल यांनी केला आहे. प्रतिमेचे निर्माण कार्य दहा वर्षे चालले आहे. या प्रतिमेचे दर्शन चांगल्या प्रकारे व्हावे आणि प्रतिमेच्या जवळच प्रार्थना करण्याची सोयही उपलब्ध व्हावी यासाठी लिफ्ट आणि एक सभागृहही निर्माण करण्यात आले आहे. मूर्तीच्या आतल्या भागात दोन लिफ्ट बसविण्यात येतील. प्रारंभी प्रतिमेची उंची 251 फूट इतकी निर्धारित करण्यात आली होती. तथापि, ऐनवेळी ती 351 फूट करण्याचा निर्णय घेण्यात आला. लिफ्टमधून प्रत्येक वेळी प्रत्येकी 29 भाविक प्रतिमेचे जवळून मुखदर्शन घेऊ शकतील. त्यानंतर 280 फूट उंचीवर एका वेळी 13 भाविक जाऊ शकतील. लिफ्टबरोबरच तीन जिनेही निर्माण करण्यात आले आहेत. आतापर्यंत नेपाळमधील कैलाशनाथ मंदिरातील शिवप्रतिमा जगातील सर्वात उंच मानली जात होती. तिची उंची 143 फूट आहे. आता ही नवी शिवप्रतिमा तिच्यापेक्षा अडीच पटीहून अधिक उंच आहे. मॉरिशस येथील मंगल महादेवाची मूर्ती 108 फूट उंच आहे. आता या दोन्ही मूर्तींना मागे टाकून राजस्थानातील ही शिवप्रतिमा आपल्या वैशिष्टय़ांसह भाविकांसमोर येत आहे.