जत तालुक्यातील कुडणूर येथील घटना
जत, प्रतिनिधी
Sangli Crime News: जत तालुक्यातील कुडणूर येथे सासू व पती यांच्याकडून पत्नीचा खून करून विहिरीत बुडून मृत्यू झाल्याचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.रूपाली सोमनाथ सरगर (वय २७,रा.कुडणूर,ता.जत)असे मृत विवाहितेचे नाव असून दि.30 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती.शवविच्छेदन अहवालानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत जत पोलिस ठाण्यात मयताचा भाऊ श्रीकांत संभाजी माने (वय २६,रा.लोणारवाडी,कवठेमहांकाळ)फिर्याद दिली आहे.पोलिसांनी संशयित आरोपी पती सोमनाथ हणमंत सरगर व सासू सखुबाई हणमंत सरगर (दोघे रा.कुडणूर,ता.जत)यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पती सोमनाथ याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, १३ वर्षांपूर्वी रूपाली व सोमनाथ याचा विवाह झाला होता.त्यांना एक मुलगा व दुसरी मुलगीला जन्म दिला आहे.मुलीच्या जन्मानंतर पती सोमनाथ याने दारू पिऊन रूपाली हिला वारंवार शिवीगाळ व मारहाण करत होता.दि.२७ सप्टेंबर रोजी रात्री मयत रूपालीचा पती,सासू सोबत वाद झाला.यातून सोमनाथ याने रूपाली हिला मारहाण केली.त्याच रात्री तिने घर सोडले.
दरम्यान,दोन दिवस तिचा शोध सुरू होता.दि.३० सप्टेंबर रोजी तिचा मृतदेह घराशेजारील विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला.तिचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पोलिसात नोंद झाली. मात्र रूपालीच्या भावाने याबाबत शंका उपस्थित केली. त्याने भाचा दादासो याला विश्वासात घेऊन विचारणा केली असता “पप्पाने मम्मीला मारल्यानंतर,पप्पाने मला तु कोणाला काहीही सांगितले तर तुलाही मारेन”,अशी धमकी दिली. तसेच आजी सखुबाई यांनी ही दादासो याला कोणाला सांगू नको,असे बजावले होते.
हि माहिती मिळताच रुपालीचे शवविच्छेदन करणारे जत ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.सदाकाळे यांची त्याने भेट घेतली. यावेळी डोक्यात अंतर्गत भागास जखम असल्याचे डॉ.सदाकाळे यांनी सांगितले.रुपालीला पोहता यत होते मात्र तरीही तिचा विहरित मृतदेह आढल्याने रूपालिच्या भावाला संशय आला होता. रुपालीचा पती सोमनाथ व सासु सखुबाई या दोघांनी संगनमत करुन रुपालीचा खून करून पुरावा नष्ट केला आणि ती बुडून मेली असल्याचा बनाव केल्याचा प्रकार समोर आला.या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.