क्षत्रिय मराठा फेडरेशनची विविध नेत्यांना भेट
प्रतिनिधी /बेळगाव
राज्यातील मराठा समाजाच्या प्रगतीसाठी अनेक मागण्या केल्या जात आहेत. विद्यमान भाजप सरकारच्या यशात मराठा समाजाचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे कर्नाटकात मराठा समाजाचा इतर मागासवर्ग 2 अ मध्ये समावेश करावा. यासाठी क्षत्रिय मराठा फेडरेशनच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे विविध नेत्यांच्या व केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या.
केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे, केंद्रीयमंत्री भगवंत खुबा, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, रामदास आठवले, कर्नाटक प्रदेश अध्यक्ष नवीनकुमार कटील, भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुणसिंह, सी. टी. रवी, खासदार मंगला अंगडी, खासदार पी. सी. गद्दीगौडर यांच्या भेटी घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांनी बेळगाव जिल्हय़ात 15 लाख व राज्यात 60 लाख मराठा नागरिक आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे. मात्र कर्नाटक सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे, हे निदर्शनास आणून दिले.
मराठा समाजातील व्यक्तींना मंत्रिपद अथवा नियामक मंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले नाही. मराठा समाजाचा केवळ राजकीय वापर करून घेतला जात आहे. भाजपला मराठा समाजाची मते आणि सहकार्य हवे आहे. त्यासाठी मराठा समाजाला अधिकार देणे हे भाजपचे कर्तव्य आहे, अशी मागणीही करण्यात आली.