आमदार युरी आलेमाव यांचा खासगी ठराव
प्रतिनिधी /मडगाव
कुंकळ्ळीतील शुर नागरीकांनी 15 जुलै रोजी उभारलेला लढा हा भारतातील वसाहतवादी शक्तींविरोधातील पहिला लढा होता. सरकारने आता 15 जूलै 1583 चा लढा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा यासाठी कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी गोवा विधानसभेच्या आगामी अधिवेशनात खासगी ठराव मांडला आहे.
सभापतीनी सदर ठराव दाखल करुन घेतल्यास सदर उठावाच्या स्मरण दिनीच म्हणजे 15 जूलै रोजी विधानसभेत चर्चेस येणार असून देशातील पहिला उठाव तथा असहकार चळवळीचे स्मरण करुन देणार आहे. योगायोगाने 15 जूलै हा दिवस सरकारने गोवा राज्याचा युद्ध स्मारक दिवस म्हणून घोषित केला आहे.
कुंकळ्ळीचा लोकप्रतिनीधी म्हणून दिल्लीतील युद्ध स्मारकाकडे आयोजित सरकारी कार्यक्रमात उपस्थित राहण्याची माजी इच्छा होती, परंतू विधानसभा अधिवेशनाच्या कामकाजामुळे मला प्रत्यक्षात तेथे हजर राहणे शक्मय होणार नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर सर्व सहकारी आमदारांनी हा ठराव एकमताने संमत करण्यास पाठींबा द्यावा असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
पोर्तुगीजांच्या वसाहतवादाविरोधात बंड पुकारलेल्या सर्व हुतात्म्यांना मी अभिवादन करतो. पोर्तुगीजांकडे कर भरण्यास नकार देणारे व असहकार चळवळ उभारणारे स्वाभिमानी कुंकळ्ळीकरांचा मला अभिमान आहे व या ऐतिहासीक मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करण्याचे मला भाग्य लाभल्याचे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
कुंकळ्ळीतील तसेच इतर अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीविरोधात लढताना आपले सर्वस्व दिले आहे. त्या सर्वांचे स्मरण करणे हे आमचे कर्तव्य आहे. कुंकळ्ळीतील चीफटेन्स मेमोरीयल तसेच इतर स्मारकांची डागडुजी व सौंदर्यीकरणाचे काम त्वरित हाती घेण्याची मागणी आपण करणार आहे. पुरातत्व खात्याकडे वास्तुविशारद हेसिंतो पिंटो यांनी 22 मार्च 2021 रोजी सादर केलेल्या अहवालावर सरकारने त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे यावर विधानसभेत लक्ष ओढणार असल्याचे युरी आलेमाव यांनी सांगितले.
आज गोव्यातील अनेक हुतात्मा स्मारके व ऐतिहासीक स्थळे अत्यंत दयनीय स्थितीत असून त्यांची तातडीने डागडूजी व देखभाल करणे गरजेचे आहे. गोवा मुक्तीलढय़ाशी संबंधीत सर्व स्थळांची यादी करुन ती ऐतिहासीक स्थळे म्हणून अधिसुचीत करण्याची मागणी आपण करणार असल्याचे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.