येत्या आर्थिक वर्षात रेल्वेकडून काम सुरू होणार
बेळगाव : भारतीय रेल्वेकडून पुढील आर्थिक वर्षात करण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा समावेश पिंकबुकमध्ये केला जातो. नैर्त्रुत्य रेल्वेने शुक्रवारी जाहीर केलेल्या पिंकबुकमध्ये बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या रेल्वेमार्गाचा समावेश आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात रेल्वेकडून या रेल्वेमार्गासाठी काम सुरू केले जाणार आहे.
सध्या असणारा बेळगाव-धारवाड व्हाया लोंढा हा मार्ग घनदाट जंगलातून जातो. जंगलातील वेड्यावाकड्या वळणांमुळे रेल्वेची गती वाढविणे शक्य होत नाही. तसेच जंगली श्वापदांचाही रेल्वेमार्गावर वावर असल्याने वेग वाढविला जात नाही. त्यामुळे रेल्वेच्या प्रवासासाठी अधिक वेळ जात असल्याने माजी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या संकल्पनेतून बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या रेल्वेमार्गाची मागणी करण्यात आली. बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर हा रेल्वेमार्ग 73 कि. मी. चा आहे. यामुळे वेळेची बचत तर होईलच त्याचबरोबर इंधनाचीही बचत होणार आहे. रेल्वेकडून नवीन प्रकल्पांची यादी पिंकबुकद्वारे जाहीर केली जाते. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर नैर्त्रुत्य रेल्वेकडून शुक्रवारी पिंकबुक जाहीर करण्यात आले. कॅम्पमध्ये या रेल्वेमार्गाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर देसूर, सांबरा येथे ओव्हरब्रिजचाही पिंकबुकमध्ये समावेश करण्यात आला आहे.
बागलकोट-कुडची रेल्वेमार्गाचाही समावेश…
बागलकोट ते कुडची या रेल्वेमार्गाचाही पिंकबुकमध्ये समावेश करण्यात आला असून त्याला 360 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्यापैकी 150 कोटीचा निधी राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. तर बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गासाठी 10 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर लोंढा-मिरज या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी 200 कोटी रुपयांचा निधी पिंकबुकद्वारे राखीव ठेवण्यात आल्याची माहिती नैर्त्रुत्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.