नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सध्या सुरु असलेल्या टी-20 मालिकेतील उर्वरित 2 सामन्यांसाठी दुखापतग्रस्त जसप्रित बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला. बुमराह आता बॅक स्ट्रेस प्रॅक्चरमुळे किमान सहा महिने व्यावसायिक क्रिकेट खेळू शकणार नाही, असे गुरुवारी स्पष्ट झाले आहे.
‘राष्ट्रीय निवड समितीने द. आफ्रिकेविरुद्ध उर्वरित सामन्यांसाठी बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजची निवड केली’, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी शुक्रवारी नमूद केले. बुमराह पाठदुखीने त्रस्त असून तो बीसीसीआय वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे, असे ते पुढे म्हणाले.
28 वर्षीय सिराजने आजवर 5 टी-20 सामने खेळले असून त्यात त्याने 5 बळी घेतले आहेत. यंदा फेब्रुवारीत श्रीलंकेविरुद्ध धरमशाला येथे त्याने आपला शेवटचा टी-20 सामना खेळला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सध्या सुरु असलेल्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघ 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. यापूर्वी, बुधवारी थिरुवनंतपूरम येथे संपन्न झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून सहज फडशा पाडला.
उभय संघातील उर्वरित दोन टी-20 सामने अनुक्रमे गुवाहाटी (2 ऑक्टोबर) व इंदोर (4 ऑक्टोबर) येथे खेळवले जाणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक चहर, उमेश यादव, श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज.