सर्व पक्षीय आमदारांची मागणी गोमेकॉवर ताण वाढत असल्याने रुग्णांचे होतात हाल
प्रतिनिधी /पणजी
गोमेकॉवरील रुग्णांचा बोजा वाढत असून तो कमी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयी – सुविधा वाढविण्याची मागणी बहुतेक आमदारांनी केली. उत्तर गोवा – दक्षिण गोवा हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने कार्यरत करावीत म्हणजे गोमेकॉवरील ताण कमी होईल, अशी सूचना आमदार दिगंबर कामत यांनी केली. गृहआधार, लाडली लक्ष्मी योजनांचे पैसे नियमित मिळावेत आणि प्रलंबित अर्ज निकालात काढावेत अशा सूचनाही आमदारांनी केल्या. आरोग्य, महिला – बालविकास खाते, वन, नगरनियोजन या खात्यावरील मागण्यांच्या चर्चेत आमदार विधानसभेत बोलत होते.
लाडली लक्ष्मी, गृहआधारचे प्रलंबित अर्ज त्वरित निकालात काढावे : आमोणकर
लाडली लक्ष्मी, गृहआधार या योजनांचे अर्ज प्रलंबित असून ते त्वरित निकालात काढावेत आणि त्यांना लाभ द्यावा, अशी मागणी आमदार संकल्प आमोणकर यांनी केली. काही सर्वेक्षक सर्वेक्षण करताना लाभार्थिंची चुकीची माहिती सरकारला देतात. परिणामी त्यांचे पैसे बंद होतात हे थांबविण्याची गरज त्यांनी वर्तविली. कोळशामुळेच मुरगांवात लोक आजारी पडतात. त्यांच्यासाठी सडा येथे हॉस्पिटल सुरु करावे असे त्यांनी सूचवले.
अंगणवाडी सेविकांचे वेतन वाढवा : क्रूझ सिल्वा
गोमेकॉमील एमबीबीएसच्या जागा वाढविण्यास सरकार अपयशी ठरल्याची टीका आमदार क्रूझ सिल्वा यांनी केली व अंगणवाडी सेविकांचे वेतन वाढवावे, असेही ते म्हणाले.
कोरोनाची जनजागृती करा : दाजी साळकर
कोरोना काळातील चांगल्या कामाबद्दल आमदार दाजी साळकर यानी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे अभिनंदन केले आणि कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याने जनजागृतीची मागणी केली. गोमेकॉवरील रुग्णांचा कामाचा ताण वाढत असून तो कमी करण्यासाठी आरोग्य केंद्रातील सोयी-सुविधा वाढवा असेही त्यांनी सूचविले. गोव्यात कॅन्सर रुग्ण वाढत असून भाजीपाला-मासळी व इतर अन्न, खाद्यपदार्थांची तपासणी होणे गरजेचे आहे. किती छापे मारले ते सांगण्याची मागणी आलेक्स रेजिनाल्ड यांनी केली. प्रादेशिक आराखडय़ाचा अजून पत्ता नाही, त्यामुळे जमीन रुपांतराचा त्रास सामान्य माणसाला होतो, असे त्यांनी निदर्शनास आणले.
दिवाडी बेटावर हॉस्पिटलची सोय करा : फळदेसाई
कुंभारजुवे, दिवाडी, सांतइस्तेव, ओल्ड गोवा येथील आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारावा आणि दिवाडी बेटावर हॉस्पिटलची सोय करावी, अशी मागणी राजेश फळदेसाई यांनी केली. कारण फेरीबाटे रात्री बंद झाली की कुठेच जाता येत नाही व रुग्णांचे हाल होतात. त्यांना उपचार मिळत नाहीत, असे ते म्हणाले.
सुपर स्पेशालिटी विभाग पूर्ण क्षमतेने सुरु करा : बोरकर
गोमेकॉची देखाभाल नीट होत नाही. अनेक सेवा चालत नाहीत. प्रसाधन कक्षाची वाईट अवस्था असून खाटा नसल्याने रुग्णांना खाली झोपावे लागते. म्हणून खाटा वाढवा आणि सुपर स्पेशालिटी विभाग पूर्ण क्षमतेने सुरु करा अशी मागणी आमदार विरेश बोरकर यांनी केली. ऑक्सिजन, व्हेंटीलेटरची सोय नियमित असावी म्हणजे होणारे बळी वाचतील असे ते म्हणाले. टिसीपीचे अधिकारी वेळेवर येत नाहीत, कारणे सांगतात आणि टाळाटाळ करतात असे त्यांनी नमूद केले. जोशुआ डिसोझा, उल्हास तुयेकर, व्हॅन्सी व्हिएगश, आंतोन वाझ यांनी चर्चेत भाग घेतला आणि आपापल्या मतदारसंघातील समस्या मांडल्या. प्राथमिक आरोग्य केंद्राची सुधारणा करा, तेथील सोयी-सुविधा वाढवा अशा मागण्या त्यांनी केल्या.
पालिकांना अनुदान द्या : दिगंबर कामत
नगरपालिका 10 ते 15 वर्षे काम केलेले रोजंदारी कर्मचारी, कामगार असून त्यांना नोकरीत कायम करा अशी मागणी आमदार दिगंबर कामत यांनी केली. त्यांच्यावर अन्याय करु नका. पालिकांना अनुदान देण्याची गरज असून त्यांना ऍक्ट्रॉय मिळत नाही म्हणून त्यांची मिळकत कमी झाली आहे. शिवाय पालिकांना वाहनांची सोय करावी. मडगाव पालिकेतील 116 पदे वाया गेली असून ती पुनरुज्जीवीत करा, असे ते म्हणाले. मडगावात पार्किंगसाठी वाहनतळाची गरज आहे. पीडीएना सुद्धा अनुदान देण्याची मागणी कामत यांनी केली. नगरसेवकांचे मानधन वाढविण्याची सूचनाही त्यांनी केली.