बीयर दरात 10 ते 12 रुपयांची वाढ
प्रतिनिधी / पणजी
गोवा सरकारने जारी केलेल्या एका आदेशानुसार राज्यात बीअरवरील अबकार करात वाढ केली आहे. त्यामुळे गोव्यात येणाऱया पर्यटकांबरोबरच स्थानिकांनादेखील बीयर महागात घ्यावी लागणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अल्कोहोलचे प्रमाण जास्त असलेल्या मद्यार्कावरील करात सरकारने वृद्धी केलेली नाही.
अबकार आयुक्त नारायण गाड यांनी जारी केलेल्या आदेशानुसार बीयरवरील अबकार करात बरीच वाढ केली आहे. त्यामुळे प्रतीलीटर दर 10 ते 12 रुपयांनी वाढणार आहे. बीयरच्या प्रत्येक बाटलीवर प्रत्यक्षात आता रु. 7 ते 8 अतिरिक्त खर्च करावे लागणार आहेत. गोव्यात मोठय़ा प्रमाणात बीयर विकली जाते. बीयरचे सेवन करणारे लोक जास्त आहेत. बीयरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यल्प असते. इतर मद्यार्कांमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असूनदेखील गोवा सरकारने त्यावरील अबकार करात कोणतीही वाढ केलेली नाही. याचाच अर्थ मद्यार्कांचे जास्तीत जास्त सेवन करावे व व ज्या बीयरमध्ये कमी अल्कोहोल आहे ते नागरिकांनी घेऊ नये.
गोव्यात सर्वाधिक बीयर खपते. त्यामुळेच राज्य सरकारने बीयरवरील करात वाढ करून जादा महसूल मिळविण्याचा प्रयत्न केला खरा. परंतु हे प्रकरण सरकारच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. राज्यातील मद्यार्क विक्री करणाऱयांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. राज्य सरकारला मोठय़ा प्रमाणात महसूल प्राप्त करून देणाऱया अबकार खात्याकडे आता बीयरची विक्री कमी झाल्यानंतर महसूल कमी प्राप्त होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.