अंडी शेकडा 516 रुपये, चिकन 230 रुपये किलो
प्रतिनिधी /बेळगाव
तापमानात घट होऊन हळूहळू थंडीला प्रारंभ होत आहे. त्यामुळे चिकन आणि अंडय़ांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे चिकन आणि अंडय़ांचे दर काहीसे वाढले आहेत. हिवाळय़ात मांसाहाराला पसंती दिली जाते. त्यामुळे अंडय़ांचा खप वाढू लागला आहे.
मागील दोन वर्षात कोरोना संकट आणि बर्ड फ्लूच्या अफवांमुळे चिकन आणि अंडय़ांच्या मागणीत मोठी घट झाली होती. कोरोना संकटानंतर पुन्हा चिकन आणि अंडी व्यवसाय सुरळीत सुरू झाला आहे. नवरात्र, गणेशोत्सव, चातुर्मास या काळात चिकन आणि अंडय़ांची मागणी कमी होते. मात्र, आता हिवाळय़ाच्या सुरुवातीपासूनच मागणी हळूहळू वाढू लागली आहे. हिवाळय़ात तब्येतीला पोषक म्हणून चिकन आणि अंडी खाणाऱयांची संख्या वाढू लागल्याने साहजिकच मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात आता 100 अंडय़ांसाठी 516 रुपये मोजावे लागत आहेत तर किरकोळ 6 रुपये एक प्रमाणे अंडे विकले जात आहे. तर चिकन 230 रुपये किलो दराने विकले जात आहे. हवामानातील बदलाचा परिणाम सध्या मार्केटवर जाणवत असल्याचे दिसत आहे.
परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने काही ठिकाणी पोल्ट्री व्यावसायिकांना फटका बसला आहे. कोंबडी आणि कोंबडय़ांची पिले मरण पावली आहेत. त्यामुळे कोंबडय़ांच्या किमती वाढल्या आहेत. थंडीच्या हंगामात मांसाहार अधिक केला जातो. शिवाय पुढील महिन्यात मार्गशीर्षच्या निमित्ताने महिलावर्ग मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे आता चिकन आणि अंडय़ांना मागणी वाढत आहे. त्याबरोबर भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याऐवजी नागरिक अंडय़ांना पसंती देताना दिसत आहेत.