रेस्टॉरंट बांधकामाच्या चौकशीचे आदेश
प्रतिनिधी/ पणजी
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कुटुंबीयांच्या आसगाव येथील कथित वादग्रस्त रेस्टॉरंटच्या बांधकामाची चौकशी करण्याचा आदेश मुख्य नगर नियोजकांनी उत्तर गोवा वरिष्ठ नगरनियोजकांना दिला आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कुटुंबीयांकडून आसगाव येथे सिली सोल्स पॅफे अँड रेस्टॉरंट चालविण्यात येते. मात्र सदर आस्थापनाला देण्यात आलेला बारचा परवाना बेकायदेशीर आहे, तसेच आस्थापनाचे बांधकामही पूर्णतः बेकायदेशीर आहे, असा दावा करून ऍड. आयरिश रॉड्रिगीश यांनी नगरनियोजन खात्यात तक्रार केली होती. तिची दखल घेऊन या प्रकरणात आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश मुख्य नगरनियोजक राजेश नाईक यांनी उत्तर गोवा वरिष्ठ नगरनियोजकांना दिले आहेत.
रेस्टॉरंटला बेकायदेशीरपणे देण्यात आलेल्या दारू परवान्याबद्दल अबकारी आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. त्याशिवाय पंचायत संचालकांनीही म्हापसा गटविकास अधिकाऱयांना चौकशी करण्यास सांगितले आहे. या प्रकरणात आता बेकायदेशीर बांधकामाचाही मुद्दा समोर आल्यामुळे सिली सोल्स प्रवर्तकांच्या अडचणी वाढल्या आहेत.