ईपीएफओचा निर्णय, निधीच्या सदस्यांना काहीसा दिलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ईपीएफओने 2022-2023 या वर्षासाठी निधींवर 8.15 टक्के व्याज देण्याची घोषणा केली आहे. गेल्यावर्षी हा व्याजदर 8.1 टक्के होता. त्यात यावर्षी 0.05 टक्के वाढ करण्यात आली आहे. हा निधीच्या सदस्यांना काहीसा दिलासा आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीच्या (ईपीएफओ) व्यवस्थापकीय मंडळाची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीत चर्चा होऊन हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या प्रथम दिवशी निवृत्तीवेतनाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर विचार करण्यात आला. तसेच, स्थिती अहवाल सादर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संपूर्णतः लागू करण्यात येईल, असे केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात संबंधितांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी एक प्रश्नोत्तरी प्रसिद्ध करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या प्रश्नोत्तरांच्या सदरात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा नेमका अर्थ स्पष्ट करण्यात येणार आहे. मात्र, आजवर ईपीएफओने या संबंधीचे सविस्तर स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच निवृत्तीवेतनाची नुकसानभरपाई आणि ठेवींच्या संदर्भात माहिती प्रसिद्ध केलेली नाही. ती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.