शरद पवार यांचे आश्वासन
प्रतिनिधी /बेळगाव
वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱया सीमाभागातील विद्यार्थ्यांना यापूर्वी अत्यंत कमी कोटा होता. त्यामुळे इच्छा असूनही सीमाभागातील विद्यार्थी महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण घेण्यापासून दूर रहात होते. ही समस्या जाणून घेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी वैद्यकीय कोटय़ात वाढ करण्याचे आश्वासन ज्योती कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान दिले.
कारवारपासून बिदरपर्यंत पसरलेल्या सीमाभागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण मिळावे यासाठी यापूर्वी सात विद्यार्थ्यांचा कोटा होता. विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या व विस्तृत प्रदेश यामुळे कोटय़ात वाढ करावी, अशी मागणी बेळगाव परिसरातून वारंवार होत होती. दोन वर्षांपूर्वी माजी महापौर सरिता पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेत निवेदन सादर केले होते.
बेळगावच्या विद्यार्थ्यांना नामी संधी
बुधवारी शरद पवार बेळगाव भेटीवर असल्याने ही समस्या त्यांच्यासमोर पुन्हा एकदा सरिता पाटील यांनी मांडली. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना फोनवरून संवाद साधत कोटय़ात वाढ करण्यासाठी चर्चा केली. आपण मुंबईला गेल्यानंतर यासंदर्भात चर्चा करू, असे पवार यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले. त्यामुळे बेळगावच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी ही नामी संधी असणार आहे.