गाय 3 तर म्हैस दूधाला 2 रूपये वाढ : उत्पादकांची दिवाळी गोड
वारणानगर / प्रतिनिधी
अवकाळी पावसामुळे निर्माण झालेली चाऱ्याची टंचाई, पशूखाद्य दरवाढ या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी वारणा दूध संघाने गायीच्या खरेदी दूधास प्रतिलिटर 3 रुपयांची तर म्हैस दूधास प्रतिलिटर 2 रूपयांची दरवाढ देण्याची घोषणा संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केली. ही दरवाढ शुक्रवार दि. 21 पासून लागू होणार आहे.
यावेळी डॉ. कोरे म्हणाले, राष्ट्रीय स्तराबरोबरच जागतिक बाजारपेठेत दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची मागणी वाढली असून त्याचा पुरवठा करण्याच्यादृष्टीने संघ प्रयत्न करत आहे. गेले अनेक दिवस दूध उत्पादकांना वैरण टंचाईसह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांना आर्थिक झळ बसू नये म्हणून वारणा दूध संघाने सतत विविध योजनाद्वारे शेतकऱ्यांना पाठबळ दिले आहे. आता गाय दूधासाठी 3.5 फॅटला व 8.5 एसएनएफला 35 रुपये झाला आहे. तर म्हैस दूधासाठी 6.0 फॅट व 9.0 एसएनएफला 47.50 इतका उच्चांकी दर मिळणार आहे. वेळोवेळी संघाने वर्षभरात गाय दूधास 9 रूपये तर म्हैस दूधास 8 रुपये दरवाढ दिली आहे. सध्या संघाकडील दूध व दूध पावडरला वाढीव मागणी आहे. संघाची दही, लस्सी, ताक, श्रीखंड, आम्रखंड या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे डॉ. कोरे यांनी सांगितले.
संघाने लम्पी स्कीन आजारावर उपचार मोहीम सुरू करून दीड लाखांवर मोफत लस जनावरांना दिली तसेच अमृत पशुधन सुरक्षा कवच योजनेतूंन 30 लाख रुपयांचे अनुदान दूध उत्पादकांना दिले आहे. अल्पदरात पशू वैद्यकीय सेवा व रेडी संगोपन यासारखे उपक्रम संघामार्फत राबविले जात असल्याचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले. याप्रसंगी संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, अकौंटस मॅनेजर सुधीर कामेरीकर, संकलन व्यवस्थापक डॉ. अशोक पाटील, मार्केटिंग इनचार्ज अनिल हेर्ले आदी उपस्थित होते.