ऑक्टोबरमध्ये 15 टक्क्यांनी वाढले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयुर्विमा कंपन्यांच्या नवीन पॉलिसींच्या प्रीमियममधून मिळणारे उत्पन्न ऑक्टोबरमध्ये 15.3 टक्क्यांनी वाढून 24,916.58 कोटी रुपये झाले आहे. जीवन विमा परिषदेच्या आकडेवारीवरून ही माहिती देण्यात आली आहे. एक वर्षापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये, सर्व 24 जीवन विमा कंपन्यांचे नवीन प्रीमियम उत्पन्न 21,606.25 कोटी रुपये राहिले होते.
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) या सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव आणि सर्वात मोठी विमा कंपनीने गेल्या महिन्यात नवीन पॉलिसी प्रीमियमच्या उत्पन्नात 18 टक्के वाढ नोंदवली असून ती 15,920.13 कोटी रुपये झाली आहे. वर्षभरापूर्वी याच महिन्यात, नवीन व्यवसायातून एलआयसीचे प्रीमियम उत्पन्न 13,500.78 कोटी रुपये झाले होते. उर्वरित 23 इतर जीवन विमा कंपन्यांचे नवीन पॉलिसी प्रीमियम देखील या कालावधीत सुमारे 11 टक्क्यांनी वाढून 8,996.45 कोटी रुपये झाले. मागील वर्षी याच कालावधीत ते 8,105.46 कोटी रुपये होते. आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात (एप्रिल-ऑक्टोबर) सर्व 24 विमा कंपन्यांच्या नवीन व्यवसायातून प्रीमियम उत्पन्न 35 टक्क्यांनी वाढून 2,06,893.51 कोटी रुपये झाले आहे.